← समर्थ रामदास संग्रह पर वापस जाएं

मनाचे श्लोक

समर्थ रामदास · मनाचे श्लोक

परिचय एवं महत्व

मनाचे श्लोक (समर्थ रामदास) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। मनाचे श्लोक के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।

मनाचे श्लोक गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमू शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें । तरी श्रीहरी पाविजे स्वभावें । जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ॥२॥ प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधीं वदावा । सदाचार हा थोर सांडूं नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे । मना धर्मता नीति सोडू नको हो । मना अंतरीं सार विचार राहो ॥४॥ मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवी धरावा । मना कल्पना ते नको वीषयाची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥ नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी । नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें । मना बोलणें नीच सोशित जावें । स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥ देहे त्यागितां कीर्ती मागें उरावी । मना सज्जना हेंचि क्रिया धरावी । मना चंदनाचे परी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नीववावें ॥८॥ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अती स्वार्थबुद्धी न रे पाप साचे । घडे भोगणें पाप ते कर्म खोटें । न होतां मनासारिखें दुःख मोठें ॥९॥ सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुःखाची स्वयें सांडि जीवीं करावी । देहेदुःख तें सुख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपी भरावे ॥१०॥ जगीं सर्व सुखी असा कोण आहे? । विचारे मना तूचि शोधूनि पाहे । मना त्वांचि रे पूर्वसंचित केलें । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ॥११॥ मना मानसीं दुःख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेकें देहबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ती भोगीत जावी ॥१२॥ मना सांग पां रावणा काय झालें । अकस्मात तें राज्य सर्वै बुडालें । म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं । बलें लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥ जिवा कर्मयोगें जनीं जन्म झाला । परी शेवटी काळमूखी निमाला । महा थोर ते मृत्युपंथेंचि गेले । कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥१४॥ मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्व ही जीव मी मी । चिरंजीव हे सर्व ही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥१५॥ मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तो ही पुढें जांत आहे । पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥१६॥ मनीं मानव व्यर्थ चिंता वाहातें । अकस्मात होणार होऊनि जातें । घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । नतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥ मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे । जया वर्णिती वेदशास्त्रें पुराणें । तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥ मना सर्वथा सत्य सांडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे । मना सत्य ते सत्य वाचें वदावें । मना मिथ्यं ते मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥ बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तेचि मोठी । निरोधे पचे कोंडिलें गर्भवासी । अधोमुख रे दुःख त्या बाळकासी ॥२०॥ मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सांडि रे द्रव्यदारा । मना यातना थोर हे गर्भवासी । मना सज्जना भेटवी राघवासी ॥२१॥ मना सज्जना हित माझें करावें । रघुनायका दृढ चित्तीं धरावें । महाराज तो स्वामि वायूसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥ न बोले मना राघवेंवीण कांहीं । जनीं वाउगें बोलतां सूख नाही । घडीनें घडी काळ आयुष्य नेतो । देहांतीं तुला कोण सोंडू पहातो ॥२३॥ रघूनायकावीण वायां शिणावें । जनासारिखें व्यर्थ का वोसणावें । सदा सर्वदा नाम वाचें वसो दे । अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥२४॥ मना वीट मानूं नको बोलण्याचा । पुढें मागुता राम जोडेल कैचा । सुखाची घडी लोटतां सुख आहे । पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥ देहरक्षणाकारणें यत्न केला । परी शेवटी काळ घेऊनि गेला । करी रे मना भक्ति या राघवाची । पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥२६॥ भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकास सांडी । रघूनायकासारिखा स्वामि शिरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥ दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढें देखतां काळ पोठी थरारी । मना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥ पदी राघवाचें सदा ब्रीद गाजे । बळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे । पुरी वाहिली सर्व जेणें विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२९॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे । जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३०॥ महासंकटी सोडिले देव जेणें । प्रतापें बळें आगळा सर्व-गुणे । जयातें स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥ अहल्या शिळा राघवें मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली । जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥ वसे मेरुमंदार हे सृष्टीलीला । शशी सूर्य तारांगणें मेघमाला । चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥ उपेक्षा कधीं रामरूपी असेना । जिवा मानवा निश्चयो तो वसेना । शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३४॥ असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा । अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥ सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे । सुखानंद आनंद कैवल्य दानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥ सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामी तैसा । हरी-भक्तिचा घाव गाजे निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३७॥ मना प्रार्थना तुजला येक आहे । रघूराज थकीत होऊनि पाहे । अवज्ञा कदी हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥३८॥ जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगें समाधान बाणे । तयालागिं हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥३९॥ मना पाविजे सर्व ही सूख जेथें । अति आदरें ठेविजे लक्ष तेथें । विवेकें कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥४०॥ बहू हिंडतां सुख होणार नाही । शिणावें परी नातुडे हीत कांही । विचारें बरें अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥४१॥ बहुतापरी हेंचि आतां धरावें । रघूनायका आपुलेंसें करावे । दिनानाथ हे तोडरीं ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥४२॥ मना सज्जना येक जीवी धरावे । जनीं आपुलें हीत तुवां करावें । रघूनायकावीण बोलों नको हो । सदा मानसी तो निजध्यास राहो ॥४३॥ मना रे जनीं मौनमुद्रा धरावी । कथा आदरें राघवाची करावी । नसे राम तें धाम सोडूनि द्यावें । सुखालागि आरण्य सेवित जावे ॥४४॥ जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे । तये संगतीची जनी कोण गोडी । जिये संगतीनें मती राम सोडी ॥४५॥ मना जे घडी राघवेंवीण गेली । जनी आपली ते तुवां हानि केली । रघूनायकावीण तो शीण आहे । जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥४६॥ मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता भक्त होऊनि राहे । गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४७॥ सदा रामनामे वदे नित्य वाचा । स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥ सदा बोलण्यासारिखे चालताहे । अनेकी सदा एक देवासि पाहे । सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥ नसे अंतरी काम नाना विकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी । निवाला मनीं लेश नाहीं तमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५०॥ मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी । प्रपंचिक नाहीं जयातें उपाधी । सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५१॥ क्रमीं वेळ जो तत्त्वचिंतानुवादें । न लिंपे कदा दंभ वादें विवादें । करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥ सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकीं । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी । न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥ सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनी मेळीं । चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५४॥ नसे अंतरी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा । ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५५॥ दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जगी दासपाळू । तया अंतरी क्रोध संताप कैसा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५६॥ जगीं होइजे धन्य या रामनामें । क्रिया भक्ति उपासना नित्य-नेमें । उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥ नको वासना वीषयी वृत्तिरूपें । पदार्थी जडे कामना पूर्वपापें । सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोही नसावा ॥५८॥ मना कल्पना कल्पिता कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी । मनीं कामना राम नाहीं जयाला । अती आदरें प्रीती नाही तयाला ॥५९॥ मना राम कल्पतरू कामधेनू । निधी-सार चिंतामणी काय वानू । जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आतां ॥६०॥ उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे । जनी सज्जनी वाद हा वाढवावा । पुढे मागुता शोक जीवी धरावा ॥६१॥ निजध्यास तो सर्व तूटोनी गेला । बळें अंतरीं शोक संताप ठेला । सुखानंद आनंद भेदे बुडाला । मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला ॥६२॥ घरी कामधेनू पुढें ताक मागे । हरीबोध सांडूनि विवाद लागें । करीं सार चिंतामणी काचखंडे । तया मागतां देत आहे उदंडें ॥६३॥ अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्तीं वसेना । अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ॥६४॥ नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणें । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणें । धरीं रे मना आदरें प्रीति रामीं । नको वासना हेमधामी विरामीं ॥६५॥ नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे । जनीं विष खाता पुढे सूख कैचें । करी रे मना ध्यान या राघवाचें ॥६६॥ घनश्याम हा राम लावण्यरूपी । महा धीर गंभीर पूर्णप्रतापी । करी संकटी सेवकांचा कुडावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६७॥ बळें आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी । पुढें मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६८॥ सुखानंदकारी निवारी भयातें । जनीं भक्तिभावें भजावें तयातें । विवेकें त्यजावा अनाचार हेवा । प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥६९॥ सदा रामनामे वदा पूर्णकामें । कदा बाधिजे नापदा नित्य नेमें । मदालस्य हा सर्व सोडून द्यावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७०॥ जयाचेनि नामें महादोष जाती । जयाचेनि नामें गती पाविजेती । जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७१॥ न वेंचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही । मुखें नाम उच्चारिंता कष्ट नाही । महाघोर संसार शत्रू जिनावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७२॥ देहदंडणेचें महा दुःख आहे । महा दुःख तें नाम घेतां न राहे । सदाशिव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७३॥ बहूतापरी संकटें साधनांची । व्रतें दान उद्यापनें ती धनाची । दिनाचा दयाळू मनीं आठवावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७४॥ समस्तांमधे सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधून पाहे । जिवा संशयो वाउगा तो त्यजावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७५॥ नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही । म्हणे दास विश्वास नामीं धरावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७६॥ करी काम निष्काम या राघवाचें । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें । करी छेद निर्द्वंद्व हे गूण गाता । हरीकीर्तनी वृत्ती-विश्वास होतां ॥७७॥ अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं । तया पामरा बाधिजे सर्व कांही । महाराज तो स्वामी कैवल्यदाता । वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥ मना पावना भावना राघवाची । धरी अंतरीं सोडि चिंता भवाची । भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥७९॥ धरा श्रीवरा त्या हा अंतरातें । तरा दुस्तरा त्या परा सागरातें । सरा वीसरा त्या भगदुर्भरातें । करा नीकरा त्या खरा मत्सरातें ॥८०॥ मना मत्सरें नाम सांडू नको हो । अती आदरें हा निजध्यास राहो । समस्तांमधें नाम हें सार आहे । दुजी तूळणा तुलितांही न साहे ॥८१॥ बहू नाम या रामनामीं तुळेना । अभाग्या नरा पामरा हें कळेना । विषा औषधे घेतलें पार्वतीशें । जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥८२॥ जेणें जालिला काम तो राम ध्यातो । उमेसी अती आदरें गूण गातो । बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें । परी अंतरीं राम विश्वास तेथें ॥८३॥ विठोने शिरी वाहिला देवराणा । तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा । निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी । जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥८४॥ भजा राम विश्राम योगेश्वराचा । जपू नेमिला नेम गौरीहराचा । स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ॥८५॥ मुखीं राम विश्राम तेथेचि आहे । सदानंद आनंद सेवूनि राहे । तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हें नाम शोकापहारी ॥८६॥ मुखी राम त्या काम बाधू शकेना । गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना । हरीभक्त तो शक्त कामास मारी । जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥८७॥ बहू चांगलें नाम या राघवाचें । अती साजिरे स्वल्प सोपें फुकाचें । करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें । जिवां मानवां हेचि कैवल्य साचे ॥८८॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावें । अती आदरे गद्य-घोषें म्हणावें । हरीचिंतनें अन्न सेवीत जावें । तरी श्रीहरी पाविजो तो स्वभावे ॥८९॥ नये राम वाणी तया थोर हानी । जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी । हरी-नाम हें वेदशास्त्रे पुराणीं । बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥९०॥ नको वीट मानू रघूनायकाचा । अती आदरे बोलिजे राम वाचा । न वेचे मुखी सांपडे रे फुकाचा । करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥९१॥ अती आदरे सर्व ही नामघोषें । गिरीकंदरे जाईजे दूरि दोषें । हरी तिष्ठतु तोषला नमतोषे । विशेषे हरा मानसी रामपीसे ॥९२॥ जगी पाहतां देव हा अन्नदाता । तया लागली तत्त्वतां सार चिंता । तयाचे मुखीं नाम घेता फुकाचे । मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥९३॥ तिन्ही लोक जाळू शके कोप येतां । निवाला हरू तो मुखे नाम घेता । जपे आदरे पार्वती विश्वमाता । म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आता ॥९४॥ अजामेळ पापी वदे पुत्रकामे । तया मुक्ति नारायणाचेनि नामे । शुकाकारणे कुंटणी राम वाणी । मुखें बोलतां ख्याति जाली पुराणी ॥९५॥ महा भक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी । जपे रामनामावली नित्यकाळी । पिता पापरूपी तया देखवेना । जनी दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥९६॥ मुखी नाम नाही तया मुक्ति कैची । अहंतागुणे यातना ते फुकाची । पुढे अंत येईल तो दैन्यवाणा । म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥९७॥ हरीनाम नेमस्त पाषाण तारी । बहू तारिले मानवदेहधारी । तया रामनामी सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥९८॥ जगी धन्य वाराणसी पुण्यरासी । तयेमाजिं जातां गति पूर्वजांसी । मुखें रामनामावली नित्यकाळी । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥९९॥ येथासांग रे कर्म तेहि घडेना । घडे कर्म तें पुण्य गांठी पडेना । दया पाहतां सर्व भूती असेना । फुकाचे मुखी नाम तेंही वसेना ॥१००॥ जया नावडे नाम त्या यम जाची । विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची । म्हणोनी अति आदरें नाम घ्यावे । मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥१०१॥ अती लीनता सर्वभावें स्वभावे । जना सज्जनालागिं संतोषवावें । देहे कारणी सर्व लावीत जावे । सगूणी अती आदरेसी भजावें ॥१०२॥ हरीकीर्तनें प्रीति रामी धरावी । देहेबुद्धी नीरूपणी वीसरावी । परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥१०३॥ क्रियेवीण नानापरी बोलिजेते । परी चीत दुश्चीत ते लाजवीतें । मना कल्पना धीट सैराट धावे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥१०४॥ विवेकें क्रिया आपुली पालटावी । अती आदरे शुद्ध क्रिया धरावी । जनि बोलण्यासारिखे चाल बापा । मना कल्पना सोडि संसारतापा ॥१०५॥ बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा । विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा । दया सर्व भूती जया मानवाला । सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥१०६॥ मना कोपआरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगी वसावी । मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी । मना होईरे मोक्षभागी विभागी ॥१०७॥ सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे । क्रियेवीण वाचाळता ते निवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥ जनी वाद वेवाद सोडूनि द्यावा । जनी सूखसंवाद मूखे करावा । जगी तोचि तो शोक संतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥ तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव यासी जिणावे । अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥ हिताकारणे बोलणे सत्य आहे । हिताकारणे सर्व शोधून पाहे । हिताकारणे बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१११॥ जनी सांगतां ऐकता जन्म गेला । परी वाद वेवाद तैसाचि ठेला । उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११२॥ जनी हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले । तयाहूनि व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥११३॥ फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसेंदीस अभ्यंतरी गर्व साचें । क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूं चि शोधूनि पाहे ॥११४॥ तुटे वाद संवाद तेथे करावा । विवेकें अहंभाव हा पालटावा । जनी बोलण्यासारखे आचरावें । क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥११५॥ बहू श्रापिता कष्टला अंबरूषी । तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी । दिल्हा क्षीरसिंधू तया ऊपमानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११६॥ धरू लेकरू बापुडे दैन्यवाणे । कृपा भाकिता दीधली भेटि जेणे । चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११७॥ गजेंद्रू महा संकटी वाट पाहे । तयाकारणे श्रीहरी धांवताहे । उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११८॥ अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळूपणे तो जनी मुक्त केला । अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११९॥ विधीकारणे जाहला मच्छ वेगी । धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी । जना रक्षणाकारणे नीच योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२०॥ महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनी तयाकारणे सिंह झाला । न ये जाळ वीषाळ संन्नी कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२१॥ कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । तयाकारणे वामनू चक्रपाणी । भार्गवू चापपाणी । द्विजांकारणे अहिल्ये सतीलांगिं आरण्यपंथे । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२२॥ कुडावा पुढे देव बंदी तयाते । बळे सोडिता घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१२३॥ तये द्रौपदीकारणे लागवेगे । त्वरे धावला सर्व सांडूनि मागे । कळीलागि झाला असे बौद्ध मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥ अनाथा दिनाकारणे जन्मताहे । कलंकी पुढे देव होणार आहे । तया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२५॥ जनाकारणे देव लीलावतारी । बहूतांपरी आदरे वेषधारी । तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी ॥१२६॥ जगी धन्य तो रामसूखे निवाला । कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला । देहेभावना रामबोधें उडाली । मनोवासना रामरूपी बुडाली ॥१२७॥ मना वासना वासुदेवी वसो दे । मना कामना कामसंगी नसों दे । मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे ॥१२८॥ गतीकारणे संगती सज्जनाची । मती पालटे सूमती दुर्जनाची । रतीनायिकेचा पती भ्रष्ट आहे । म्हणोनी मनातीत होऊनि राहे ॥१२९॥ मना अल्प संकल्प तो ही नसावा । मना सत्य संकल्प चित्तीं वसावा । जनी जल्प वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत येकांतकाळी भजावा ॥१३०॥ भजाया जनी पाहता राम येकू । करी बाण येकू मुखी शब्द येकू । क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । धरा जानकीनायकाचा विवेकू ॥१३१॥ विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त ते ही निवाले । बरे शोधल्यावीण बोलो नको हो । जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥१३२॥ हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी । जेणे मानसी स्थापिले निश्चयासी । तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे । तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥१३३॥ नसे गर्व अंगी सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी । नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इही लक्षणी जाणिजे योगिराजा ॥१३४॥ धरी रे मना संगती सज्जनांची । जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची । बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे । महा क्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥ भयें व्यापिले सर्व ब्रम्हांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहे । जया पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथा ही असेना ॥१३६॥ जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसेची ठेले । देहेबुद्धिचें कर्म खोटे टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३७॥ भ्रमें नाढळे वित्त ते गुप्त जाले । जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें । देहेबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३८॥ पुढे पाहता सर्वही कोंदलेंसे । अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे । अभावे कदा पुण्य गांठी पडेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३९॥ जयाचे तया चूकले प्राप्त नाही । गुणे गोविले जाहले दुःख देही । गुणावेगळी वृत्ति तेही वळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१४०॥ म्हणे दास सायास त्याचे करावे । जनी जाणता पाय त्याचे धरावे । गूरूअंजने वीण ते आकळेना । जुने ठेवणे मीपणे ते कळेना ॥१४१॥ कळेना कळेना कळेना ढळेना । ढळे नाढळे संशयोही ढळेना । गळेना गळेना अहंता गळेना । बळे आकळेना मिळेना ॥१४२॥ अविद्यागुणे मानवा ऊमजेना । भ्रमे चूकले हीत ते आकळेना । परीक्षेविणें बांधिले दृढ नाणें । परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥१४३॥ जगी पाहता साच ते काय आहे । अती आदरें सत्य शोधूनि पाहे । पुढे पाहतां पाहतां देव जोडे । भ्रम भ्रांति अज्ञान हे सर्व मोडे ॥१४४॥ सदा विषयो चिंतीतां जीव जाला । अहंभाव अज्ञान जन्मासि आला । विवेकें सदा स्वस्वरूपी भरावे । जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें ॥१४५॥ दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी । अकस्मात आकारले काळ मोडी । पुढे सर्व जाईल काही न राहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४६॥ फुटेना तुटेना चलेना ठळेना । सदा संचले मीपणे ते कळेना । तया एक रूपासि दूजे न राहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४७॥ निराकार आधार ब्रम्हादिकांचा । जया सांगतां सीणली वेदवाचा । विवेके तदाकार होऊनि राहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४८॥ जगी पाहतां चर्मचक्षी न लक्षे । जगी पाहतां ज्ञानचक्षी न रक्षे । जगी पाहता पाहणे जात आहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४९॥ नसे पीत ना श्वेत ना शाम काही । नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही । म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१५०॥ खरे शोधितां शोधिताही शोधिताहे । मना बोधितां बोधितां बोधिताहे । परी सर्वही सज्जनाचेनि योगें । बरा निश्चयो पाविजे सानुरागे ॥१५१॥ बहूतां परी कूसरी तत्वझाडा । परी पाहिजे अंतरी तो निवाडा । मना सार साचार ते वेगळे रे । समस्तांमधे एकते आगळे रे ॥१५२॥ नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञाने । समाधान काही नव्हे तानमाने । नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागे । समाधान ते सज्जनाचेनि योगे ॥१५३॥ महावाक्य तत्वादिकें पंचिकर्णे । खुणे पाविजे संतसंगे विवर्णे । द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो । तया सांडुनि चंद्रमा भाविजेतो ॥१५४॥ दिसेना जनी तेचि शोधूनि पाहे । बरे पाहतां गूज तेथेचि आहे । करी घेऊन जाता कदा आढळेना । जनी सर्व कोंदाटले ते कळेना ॥१५५॥ म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे । अतर्कांसि तर्की असा कोण आहे । जनी मीपणे पाहता पाहवेना । तया लक्षिता वेगळे राहवेना ॥१५६॥ बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे । जया निश्चयो येक तोही न साहे । मती भांडती शास्त्रबोधे विरोधें । गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥१५७॥ श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे । स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे । स्वये शेष मौनवाला स्थीर राहे । मना सर्व जाणीव सांडून राहे ॥१५८॥ जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रूची प्राप्त कैची । अहंभाव ज्या मानसीचा विरेना । तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥१५९॥ नको रे मना वाद हा खेदकारी । नको रे मना भेद नाना विकारी । नको रे मना सीकऊं पूढिलांसी । अहंभाव जो राहिला तूजपासी ॥१६०॥ अहंतागुणे सर्वही दुःख होते । मुखे बोलिले ज्ञान ते वेर्थ जाते । सुखी राहता सर्वही सुख आहे । अहंता तुझी तूंचि शोधूनि पाहे ॥१६१॥ अहंतागुणे नीति सांडी विवेकी । अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी । परी अंतरी सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥१६२॥ देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला । देहातीत ते हीत सांडित गेला । देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६३॥ मने कल्पिला वीषयो सोडवावा । मने देव निर्गूण तो वोळखावा । मने कल्पिता कल्पना ते सरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६४॥ देहादीक प्रपंच हा चिंतियेला । परी अंतरी लोभ निश्चित ठेला । हरीचिंतने मुक्तिकांता वरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६५॥ अहंकार विस्तारला या देहाचा । स्त्रियापूत्रमित्रादिके मोह त्यांचा । बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६६॥ बरा निश्चयो शाश्वताचा करावा । म्हणे दास संदेह तो वीसरावा । घडीने घडी सार्थकाची करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६७॥ करी वृत्ति जो संत तो संत जाणा । दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा । उपाधी देहेबुद्धिते वाढवीते । परी सज्जना केवि बाधू शक्के ते ॥१६८॥ नसे अंत आनंत संता पुसावा । अहंकार विस्तार हा निरसावा । गुणेंवीण निर्गूण तो आठवावा । देहेबुद्धिचा आठवू नाठवावा ॥१६९॥ देहेबुद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी । विवेके तये वस्तुचि भेट घ्यावी । तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे । म्हणोनि सदा तेंचि शोधीत जावे ॥१७०॥ असे सार साचार ते चोरलेंसे । इही लोचनी पाहतां दृश्य भासे । निराभास निर्गूण ते आकळेना । अहंतागुणे कल्पितांही कळेना ॥१७१॥ स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या । स्फुरे ब्रम्ह रे जाण माया सुविद्या । मुळी कल्पना दो रूपे तेंचि आली । विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली ॥१७२॥ स्वरूपी उदेला अहंकार राहो । तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो । दिशा पाहतां ते निशा वाढताहे । विवेके विचारे विवंचूनि पाहे ॥१७३॥ जया चक्षुने लक्षितां लक्षवेना । भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना । क्षयातित तो आक्षयी मोक्ष देतो । दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ॥१७४॥ विधी निर्मितां लीहितो सर्व भाळी । परी लीहिता कोण त्याचे कपाळी । हरू जाळितो लोक संहारकाळी । परी शेवटीं शंकरा कोण जाळी ॥१७५॥ जगी द्वादशादित्य हे रूद्र आक्रा । असंख्यात संख्या करी कोण शक्रा । जगी देव धुंडाळिता आढळेना । जनी मुख्य तो कोण कैसा कळेना ॥१७६॥ तुटेना फुटेना कदा देवराणा । चळेना ढळेना कदा दैन्यवाणा । कळेना वळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जगी मीपणासी ॥१७७॥ जया मानला देव तो पूजिताहे । परी देव शोधूनि कोणी न पाहे । जगी पाहतां देव कोट्यानुकोटी । जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥१७८॥ तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले । तया देवरायासी कोणी न बोले । जगी थोरला देव तो चोरलासे । गूरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥१७९॥ गुरू पाहतांपाहतां लक्ष कोटी । बहुसाल मंत्रावळी शक्ति मोठी । मनी कामना चेटके धातमाता । जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥१८०॥ नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू । नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू । नव्हे उन्मतु वेसनी संगबाधू । जनी ज्ञानिया तोचि साधू अगाधू ॥१८१॥ नव्हे वाउगी चाहुटी कामपोटी । क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी । मुखे बोलिल्यासारिखे चालताहे । मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे ॥१८२॥ जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी । कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी । प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे । तयाचेनि योगे समाधान बाणे ॥१८३॥ नव्हे तेचि जाले नसे तेंचि आले । कळो लागले सजन्नाचेनि बोले । अनिवार्च्य ते वाच्य वाचे वदावे । मना संत आनंत शोधीत जावे ॥१८४॥ लपावे अति आदरे रामरूपी । भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी । कदा तो जनी पाहतां ही दिसेना । सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥१८५॥ सदा सर्वदा राम सन्नीध आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे । अखंडित भेटी रघूराज योगू । मना सांडिमीपणाचा वियोगू ॥१८६॥ भुते पिंड ब्रम्हांड हे ऐक्य आहे । परी सर्वही स्वस्वरूपी न साहे । मना भासले सर्व काही पहावे । परी संग सोडूनि सूखी रहावे ॥१८७॥ देहेभान हे ज्ञानशास्त्रें खुडावे । विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे । विरक्तीबळे निंद्य सर्वे त्यजावे । परी संग सोडूनि सूखे रहावे ॥१८८॥ मही निर्मिली देंव तो वोळखावा । जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा । त्या निर्गुणालागि गूणी पहावे । परी संग सोडूनि सूखे रहावे ॥१८९॥ नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता । परेहून पर्ता न लिंपे विवर्ता । तया निर्विकल्पासि कल्पीत जावे । परी संग सोडूनि सूखे रहावे ॥१९०॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना । तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना । परब्रम्ह ते मीपणे आकळेना । मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥१९१॥ मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे । दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे । तया खूण ते हीण दृष्टांत पाहे । तेथे संग निःसंग दोनी न साहे ॥१९२॥ नव्हे नेणता जाणता देवराणा । न ये वर्णिता वेदशास्त्रं पुराणां । नव्हे अदृश्य साक्षी तयाचा । श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥ वसे हृदयी देव तो कोण कैसा । पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा । देहे टाकितां देव कोठे रहातो । परी मागुता ठाव कोठे पहातो ॥१९४॥ तो जाण ऐसा । नभाचेपरी व्यापकू जाण तैसा । सदा संचला येत ना जात काही । तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥१९५॥ नभी वावरे जो अणूरेणु कांही । रिता ठाव या राघवेंवीण नाही । तया पाहतां पाहतां तेंचि जाले । तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥१९६॥ नभासारिखे रूप या राघवाचे । मनी चिंतितां मूळ तूटे भवाचें । तया पाहतां देहबुद्धी उरेना । सदा सर्वदा आर्त पोटी उरेना ॥१९७॥ नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे । रघूनायका ऊपमा ते न साहे । दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे । तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥१९८॥ अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे । तेथे तर्कसंपर्क तोही न साहे । अती गूढ ते दृश्य तत्काळ सोपे । दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापे ॥१९९॥ कळे आकळे रूप ते ज्ञान होतां । तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था । मना उन्मनी शब्द कुंठीत राहे । तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥२००॥ कदा ओळखीमाजि दूजे दिसेना । मनी मानसी द्वैत कांही वसेना । बहूता दिसां आपुली भेटि जाली । विदेहीपणे सर्व काया निवाली ॥२०१॥ मना गूज रे तूज हे प्राप्त जाले । परी अंतरी पाहिजे यत्न केले । सदा श्रवणे पाविजे निश्चयासी । धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥२०२॥ मना सर्वही संग सोडूनि द्यावा । अती आदरे सज्जनाचा धरावा । जयाचेनि संगे महा दुःख भंगे । जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥ मना संग हा सर्व संगास तोडी । मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी । मना संग हा साधकां सीघ्र सोडी । मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥२०४॥ मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती । चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आंगी । म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ॥२०५॥

सभी समर्थ रामदास पाठ अगला पाठ →

पाठ की विधि

प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर समर्थ रामदास के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ मनाचे श्लोक का पाठ करें।

पाठ के लाभ

भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।