श्रीशनैश्चरमाहात्म्य श्रीगणेशाय नमः । ॐ नमो जी गणनायका । एकदंता वरदायका । स्वरूपसुंदरा विनायका । करीं कृपा मजवरी ॥ १ ॥ आता नमूं ब्रह्मकुमारी । हंसारूढ वागीश्वरी । वीणा शोभे दक्षिण करीं । विजयमूर्ति सर्वदा ॥ २ ॥ नमन माझे गुरुवर्या । सुखमूर्ति करुणालया । नमूं संतश्रोतयांच्या पायां । अभेदभेदा करूनी ॥ ३ ॥ आतां नमूं श्रीपांडुरंगा । यावें तुवां कथेचिया प्रसंगा । निरसूनि माझिया भवसंगा । करी कृपा मजवरी ॥ ४ ॥ गुजरात भाषेची कथा । नवग्रहांची तत्त्वतां । ही ऐकतां एकचित्ता । संकट व्यथा न बाधती ॥ ५ ॥ आतां उज्जयिनीनाम नगरीं । राजा विक्रम राज्य करी । तेथील चरित्राची परी । ऐका चित्त देऊनियां ॥ ६ ॥ कोणी एके दिवशीं प्रातःकाळीं । बैसली होती सभामंडळी । तेथें महापंडित त्या काळीं । लहानथोर बैसले ॥ ७ ॥ ऐसी सभा बैसली घनदाट । तेथें चर्चा निघाली सुभट । म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ । सांगावें नीट निवडोनी ॥ ८ ॥ कोण्या ग्रहाची कैसी स्थिती । कैसी पूजा कैसी मती । कोण रूप कैसी गती । ऐसें यथार्थ सांगावें ॥ ९ ॥ ऐसें ऐकतांचि उत्तर । पंडित सरसावले समोर । काढोनि पुस्तकांचा संभार । बोलती ते यथामतीनें ॥ १० ॥ प्रथम एक पंडित बोलिला । रविग्रह तो असे भला । जो लागे त्याच्या उपासनेला । त्यासी ग्रहपीडा न बाधे ॥ ११ ॥ रवि तो सूर्यनारायण । जे नर झाले तत्परायण । त्यांचीं विघ्नें होतीं निरसन । महासामर्थ्य रवीचें ॥ १२ ॥ आधि व्याधि दरिद्र । स्मरणमात्रेंचि होती दूर । मग उपासना करी जो नर । चिंतिले अर्थ सर्व पुरती ॥ १३ ॥ रवि तो मुख्य दैवत । त्यावीण सर्वही जाणा व्यर्थ । नवग्रह आज्ञा पाळीत । ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ॥ १४ ॥ ऐकतां रवीची वार्ता । आणि त्या इतर ग्रहांची कथा । तेणें निवारे सर्व व्यथा । ऐसे नवग्रहही समर्थ ॥ १५ ॥ परी रवि असे महाबळी । सर्वांमाजीं अतुर्बळी । प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळीं । तो हा सूर्यनारायण ॥ १६ ॥ तंव दुसरा पंडित बोलत । सोमासी असे बळ अद्भुत । तो माळी असें म्हणवीत । वनस्पती पोषीतसे ॥ १७ ॥ जयाचें आराध्य दैवत । शिव सांब कैलासनाथ । त्याच्या भाळीं हा विलसत । म्हणोनि श्रेष्ठ जाणावा ॥ १८ ॥ चंद्र वर्षे अमृतास । तृप्त करी सर्व देवांस । निशिराज महारूपस । षोडश कळा जयासी ॥ १९ ॥ तो न गांजीच कोणासी । अति सौख्यदाता सर्वांसी । सदासर्वदा निर्मळमानसीं । धन्य जयाचें पूजन ॥ २० ॥ मग तिसरा पंडित बोलत । ऐक राया सुनिश्चित । मंगळ तो महासमर्थ । कथा ऐक तयाची ॥ २१ ॥ मंगळग्रह हा महाक्रूर । जैसा कां ते खड्गाची धार । तयाचा न कळे पार । सर्व ग्रहांमाजीं वरिष्ठ हा ॥ २२ ॥ मंगळ ग्रह सोनार । क्रूरता जयाची अति थोर । परी तो पूजकासी कृपाकर । मंगल करी सर्वदा ॥ २३ ॥ गर्व धरूनि पूजा न करिती । मग तो खवळे उग्रमूर्ती । विलया जाय संतती संपत्ती । शेवटी नाश करी जीवित्वाचा ॥ २४ ॥ तोचि पूजकांसी सदा प्रसन्न । सर्व अर्थ करी पावन । सर्व दुःख निरसून । अंतर्बाह्य संरक्षी ॥ २५ ॥ तंव बोले चौथा पंडित । बुध असे महाबळवंत । बुधाचा प्रताप अद्भुत । सर्व ग्रहांमाजी ॥ २६ ॥ बुध जातीचा असे वाणी । नवग्रहांत शिरोमणी । विघ्नें नासती तयाच्या पूजनीं । सर्वानंद प्राप्त करी ॥ २७ ॥ बुध ज्यावरी कृपा करी । लक्ष्मीवंत त्यासी करी । ऐसा तो महापरोपकारी । बुधग्रह जाणिजे ॥ २८ ॥ बुधग्रह आहे ज्यास नीट । त्यासी सर्व मार्ग सुचती सुभट । कोणत्या कार्यासही तूट । तो न करी कल्पांतीं ॥ २९ ॥ बुधाची बुद्धि भारी । कोणासी निष्ठुरता तो न करी । संसारचिंता हरी । प्राणिमात्राची सर्वथा ॥ ३० ॥ मग बोले पांचवा पंडित । गुरूचे सामर्थ्य असे अद्भुत । गुरु तो श्रेष्ठ सर्वांत । इंद्रादिदेवां समस्तां ॥ ३१ ॥ गुरुज्ञानाचा न कळे पार । भाविकांसी तो करुणाकर । कर्माकर्मांचा करी चूर । भवभयव्यथेसीं ॥ ३२ ॥ दुःख आणि दारिद्र्य, रोग । स्मरणमात्रें होती भंग । नवग्रहांत महायोग्य । ऐसा गुरु जाणिजे ॥ ३३ ॥ गुरु जातीचा असे ब्राह्मण । सर्वांत श्रेष्ठ असे वर्ण । सर्व देव करिती मान्य । गुरुवचनासी ॥ ३४ ॥ गुरु असे ज्ञानाचा पुरा । तयाच्या साम्यासी नसे दुसरा । त्यापुढें नुरेचि थारा । कल्पनेचा कदाही ॥ ३५ ॥ म्हणोनि करितां गुरुसेवा । मग ग्रहांचा कोण केवा । गुरु सर्वभावें भजावा । तेणें संतोष सर्व ग्रहांसी ॥ ३६ ॥ शिव करी गुरुपूजनासी । तेथें पाड काय इतरांसी । ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी । आगमागम ॥ ३७ ॥ तंव सहावा पंडित बोलिला । शुक्रग्रह असे बहु भला । जेणें राक्षसां उपकार केला । संजीवनीमंत्रेंकरोनि ॥ ३८ ॥ शुक्र गुरु तो दैत्यांचा । त्रिभुवनी धाक वाहती जयाचा । पार न कळे सामर्थ्याचा । म्हणोनि श्रेष्ठ तो ॥ ३९ ॥ शुक्राची शक्ति आहे फार । तो करी कर्माकर्माचा चूर । विघ्नें पळती दूरच्या दूर । शुक्राचें नाम घेतां ॥ ४० ॥ शुक्रपूजनीं जे तत्पर । त्यांच्या शौर्यासी नाहीं पारावार । जो दिव्यदेही निरंतर । एकाक्ष तो ॥ ४१ ॥ आधि व्याधि दुःख दारिद्र्य । स्मरणमात्रेचि होती दूर । सर्वाभीष्ट परिकर । प्राप्त करी पूजका ॥ ४२ ॥ नवग्रहांत शिरोमणी । ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी । मान्यता श्रेष्ठ सर्वांहूनि । शुक्राची असें जाण पां ॥ ४३ ॥ ऐसे हे सहा ग्रह ऐकोनि राजा । तर्जनी मस्तक डोलवी वोजा । म्हणे उत्तम कथिलें काजा । अखंडित यांते स्मरावें ॥ ४४ ॥ आणिक ग्रह राहिले कोण । सांगा पंडित हो निवडून । कैसीं त्यांचीं नामें खूण । त्या मूर्तीसी बोलिजे ॥ ४५ ॥ मग संकेतें बोले पंडित । राहु आणि दुसरा केतु । हे उभयतां अति अद्भुत । दैत्यकुळींचे असती ॥ ४६ ॥ मातंगजातीचे दोन्ही । दुष्ट क्रिया म्हणवोनी । त्यांच्या दर्शनें चंद्रसूर्य गगनीं । चळाचळा कांपती ॥ ४७ ॥ राहु पीडी चंद्रासी । केतु तो सूर्यासी । ग्रहण बोलिजे तयासी । प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे ॥ ४८ ॥ प्राणिमात्र सर्व जन । त्यांसी न सांडिती पीडेवीण । परी केलिया पूजन-स्मरण । किंचित् पीडा करिताती ॥ ४९ ॥ राहु महापीडक अनिवार माया । तद्रूपचि जाण राया । उभयतांची एक चर्या । पूजन-स्मरणें संतोषती ॥ ५० ॥ सर्व ग्रहांपरीस अति क्रूर । जनांसी पीडा करिती फार । म्हणोनि पूजन-स्मरण निरंतर । राहुकेतूंचें करावें ॥ ५१ ॥ तंव नववा पंडित बोलत । शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यांत । बलाढ्य होय अति अद्भुत । न कळे कळा तयाची ॥ ५२ ॥ तो ज्यावरी करी कृपा । त्यासी सर्व मार्ग असे सोपा । ग्रहदिक्पाळांवरी छापा । तया शनिग्रहाचा ॥ ५३ ॥ ज्यावरी तो कोपासी चढे । तयावरी नाना विघ्नें येती रोकडें । तयाचा संसार बिघडे । न राहे कल्पांतीं ॥ ५४ ॥ शनिदेव महाक्रोधी । ज्याचा पराजय नोहे युद्धीं । देवदानवां त्रिशुद्धीं । दुःखदाता शनिदेव ॥ ५५ ॥ जो कां भाविक सज्ञान नर । जो या ग्रंथाचा करी आदर । पूजन स्मरण निरंतर । त्यावर कृपा करी शनिदेव ॥ ५६ ॥ शनैश्वराची मूर्ति काळी । तो जातीचा होय तेली । चरण पंगु सुरत चांगली । पूजा करी काळभैरवाची ॥ ५७ ॥ त्याची दृष्टि पडे जयावर । करी तयाचा चकनाचूर । अथवा कृपा करी जयावर । तयासी सर्व आनंद प्राप्त होय ॥ ५८ ॥ दृष्टीचा ऐका चमत्कार । जन्मला जेव्हां शनैश्वर । तेव्हां दृष्टि पडली पित्यावर । तेणें कुष्ठ भरला सर्वांगीं ॥ ५९ ॥ पित्याच्या रथीं होता जो सारथी । तो पांगुळ झाला निश्चितीं । अश्वांचिया नेत्रांप्रती । अंधत्व आलें तत्क्षणीं ॥ ६० ॥ तेव्हां त्यांनीं उपाय केले फार । तरी गुण न येचि अणुमात्र । जंव दृष्टि फिरवी शनैश्वर । तंव तिघेही आरोग्य जाहले ॥ ६१ ॥ ऐसें ऐकतां राजा विक्रम । हांसूनि बोले सप्रेम । म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम । ऐसा अपवित्र जो ॥ ६२ ॥ तो पुत्र नव्हे केवळ वैरी । जो उपजतांचि ऐसें करी । पुढें तो काय न करी । सांगा पंडित हो ॥ ६३ ॥ ऐसें बोलिला हांसोन । करीं टाळी वाजवी गर्जोन । सभेसी विनोदवचन । म्हणे हा पुत्र कैसा हो ॥ ६४ ॥ ऐसें बोलता ते अवसरीं । कैसी वर्तली नवलपरी । ती ऐकावी आता चतुरीं । चित्त देऊनियां ॥ ६५ ॥ त्या समयीं शनिदेव विमानीं । जात होते बैसोनी । रायाचें वाक्य ऐकतां तत्क्षणीं । विमान खाली उतरलें ॥ ६६ ॥ अकस्मात् येऊनियां सभेंत । बैसले तेव्हां विमानासहित । तंव पहाते झाले सभापंडित । म्हणती आले शनिदेव ॥ ६७ ॥ मग राव उठे झडकरोनी । जाऊनि नमन करी चरणीं । तो तंव टाकिला झिडकारोनी । शनिदेवानें ॥ ६८ ॥ म्हणे तूं राजा ऐसा मस्त । टवाळी करिसी अद्भुत । याचा चमत्कार क्षणांत । दावीन पाहें आतांचि ॥ ६९ ॥ तूं फार करितोसी टवाळी । नसतीस चढविली कळी । तरी कन्याराशीस मुळीं । तुजला ग्रह मी आलों ॥ ७० ॥ आतां पाहें माझा चमत्कार । तूं नको करूं गर्व फार । ऐसें वदोनि अति सत्वर । विमानारूढ पैं झाला ॥ ७१ ॥ तंव तो राव लागे चरणांसी । म्हणे कृपा करावी दीनासी । अन्याय घालीं पोटासी । कृपाळुवा शनिदेवा ॥ ७२ ॥ तरी तो न मानीच शनिदेव । म्हणे मी तुज दाखवीन अनुभव । तेव्हां मनीं खिन्न जाहला राव । चिंता मानसीं फार करी ॥ ७३ ॥ मग म्हणतसे पंडितांला । आम्हीं महाग्रह उगाचि छळिला । तो आतां कष्टवील आम्हांला । तरी कैसें आतां करावें ॥ ७४ ॥ जें जें पुढें होणार । म्हणोनि बुद्धि सुचे तदनुसार । तरी जें असेल लिखिताक्षर । तैसें आता होईल ॥ ७५ ॥ राव दिलगीर जाहला मानसीं । विसर्जन करी सभेसी । जाता जाहला मंदिरासी । कांही अंतरीं सुचेना ॥ ७६ ॥ करूनिया संध्यास्नान । मग करीतसे भोजन । तदनंतर करिता झाला शयन । नावेक पलंगावरी ॥ ७७ ॥ ऐसें करिता एक मास । जाहला राया विक्रमास । मग काय वर्तलें त्या कथेस । तेंचि आतां ऐकिजे ॥ ७८ ॥ राया विक्रमासी आला शनी । बारावा अती क्रूर स्थानीं । जेणें त्रासिले बहुत प्राणी । अभाविकां पीडीतसे ॥ ७९ ॥ तेव्हां पंडित बोलती वाचे । राया पूजन करी शनिग्रहाचें । साडेसात वर्षे नेमाचें । सामर्थ्य आहे जाणिजे ॥ ८० ॥ तुम्ही विनोदें हांसलां शनीसी । तरी तो कष्टवील तुम्हांसी । जो का गांजितो त्रैलोक्यासी । तोचि हा महाग्रह जाणिजे ॥ ८१ ॥ चित्त करोनियां एकाग्र । ऐकावा पूजेचा प्रकार । जेणेंकरोनि शनैश्वर । कृपा करील तुम्हांवरी ॥ ८२ ॥ प्रथम करोनि औषधीस्नान । मग करावें प्रतिमेचे पूजन । अश्वाचा नाल घेऊन । त्याची प्रतिमा करावी ॥ ८३ ॥ शास्त्रविधि पूजा निर्धार । मग तैलअभिषेक कर । मृत्तिकेच्या कुंभावर । त्याची स्थापना करावी ॥ ८४ ॥ स्थापना झालिया जाण । पूगीफल ब्राह्मणासी देऊन । तेवीस सहस्र जप संपूर्ण । यथासांग करावा ॥ ८५ ॥ जपसंख्या जाहलियावरी । चतुर्थांश हवन करीं । हवन झालियाउपरी । दानें करावीं शनीचीं ॥ ८६ ॥ मग जपकर्त्या ब्राह्मणासी । शनैश्चररूप मानूनि त्यासी । दक्षिणा देऊनि पूजेसीं । प्रसन्नचि करावें ॥ ८७ ॥ मग करावें ब्राह्मणभोजन । यथाशक्ति द्यावें दान । ब्राह्मण तृप्त होतां पूर्ण । संतोष पावे शनिदेव ॥ ८८ ॥ जेवी रक्षी बाळकासी माता । तैसें रक्षी निजभक्तां । पंडित म्हणती राया समर्था । गोष्टी एवढी ऐकावी ॥ ८९ ॥ राजा म्हणे पंडितांला । शनि न मानीच आम्हांला । तोचि मातापिता वहिला । रक्षी तोचि पैं जाणा ॥ ९० ॥ मग बोले विक्रम पंडितांसी । तुम्हीं जावें आपुल्या गृहासी । जें होणार असेल तें निश्चयेंसीं । घडून येईल न टळेचि ॥ ९१ ॥ ऐसें बोलोनियां उत्तर । काय जाहला चमत्कार । चित्त करोनियां स्थिर । श्रवण करावें सर्वांही ॥ ९२ ॥ असो मग कोणे एके दिवशीं । दोन प्रहारांच्या समयासी । कारवानवेषें उज्जयिनीसी । घोडे विकावया आले शनिदेव ॥ ९३ ॥ रूप पालटोनि आपुलें । वारू विकावया आणिले । तंव तेथें गिऱ्हाईक पातले । रावही आला त्या स्थानीं ॥ ९४ ॥ तेव्हां किंमत पुसतसे रावो । तयासी म्हणे शनिदेवो । वारू फिरवूनि पाहा हो । मग कळेल मोल तयाचें ॥ ९५ ॥ तेव्हां सारंगा वारू राव आणवीत । चाबुकस्वारासी वरी बैसवीत । तेणें घोडा फिरविला चौगगनात । अति उत्तम फिरतसे ॥ ९६ ॥ तंव दुसरा घोडा अबलख । त्याचें मोल रुपये लक्ष एक । तो सोडूनि तात्काळिक । आणिला विक्रमासीं ॥ ९७ ॥ तंव त्या सौदागरें काय केलें । राया विक्रमासीच बैसविलें । घोडा फिरवितां राव बोले । अति उत्तम फिरतसे ॥ ९८ ॥ तंव त्या घोड्यासी कोरडा मारितां । घोडा उडाला गगनपंथा । पवनवेगें वारू जातां । महावनांत ते समयीं ॥ ९९ ॥ अधिक कोरडा मारितां । तें तें अधिक जाय पंथा । थोर अवस्था होय चित्ता । केवीं वर्तलें म्हणवोनी ॥ १०० ॥ दूरदेशी अतिऊजाडी । जेथें घोर वन महाझाडी । तेथें नदीच्या पैलथडी । घोडा जाऊनि उतरला ॥ १०१ ॥ तेथें राव उतरला खालीं । तव नवलपरी वर्तली । वारू नाहीं नदी गुप्त झाली । झाडांझुडांसहीत ॥ १०२ ॥ तेव्हां आश्चर्य वाटलें विक्रमासी । म्हणे ईश्वरी गति न कळे कोणासी । वारू आणि वनासी । काय विचार पैं जाहला ॥ १०३ ॥ तंव अस्तासी पावला वासरमणी । अंधकार प्रवर्तला रजनीं । पुढे मार्ग न दिसे नयनीं । मग तेथेंचि पहुडला ॥ १०४ ॥ चार प्रहर गेलियावरी । उदयासी आला तमारी । मग तो एका नगराचा मार्ग धरी । राजा विक्रम आपण ॥ १०५ ॥ तंव तेथोनि चार योजनें दूरी । तामलिंदा नाम नगरी । तेथें जातां झाला ते अवसरी । हळूहळू पोहोंचला ॥ १०६ ॥ इकडे उज्जयिनीची कथा राहिली । ती आतां पाहिजे श्रवण केली । नगरजनें वाट पाहिली । चार प्रहर रायाची ॥ १०७ ॥ तेव्हां सौदागर म्हणे प्रधानासी । वारू द्यावा आमुचा आम्हांसी । कोणीकडे नेलें वारूसी । राया विक्रमानें ॥ १०८ ॥ तंव पहाते झाले नगराबाहेर । कोसीं दो कोसीं कोस चार । परी कोठें न दिसे राजेश्वर । मग चिंता प्रवर्तली ॥ १०९ ॥ तेव्हां सौदागर म्हणे प्रधानासी । सत्वर शोधोनि आणा रायासी । नाहीं तरी आम्हांसी । पैका द्यावा वारूचा ॥ ११० ॥ तेव्हां प्रधानासी पडली चिंता । मनीं म्हणे कैसें करावें आतां । रायाचा शोध न लागे तत्त्वतां । सौदागरें अडविलें ॥ १११ ॥ मग प्रधानें काय केलें । सौदागरासी बोलाविलें । म्हणे वारूचें मोल काय वहिलें । तें सांगा आम्हांसी ॥ ११२ ॥ तयानें मोल सांगतांचि झडकरी । मग पैका घातला तयाचें पदरी । तेव्हां प्रधानांसी पुसोनि सत्वरी । जातां झाला शनिदेव ॥ ११३ ॥ सौदागर गेलियापाठीं । मागें काय वर्तली गोष्टी । नगरजन सर्व होती कष्टी । देश पट्टणें धुंडिलीं ॥ ११४ ॥ नगरीं झाली ऐसी परी । इकडे राजा विक्रम काय करी । तया तामलिंदापुर नगरीं । ग्राममाजी प्रवेशला ॥ ११५ ॥ तंव तेथें व्यवहारी सावकार । जातीचा वैश्य धनाढ्य थोर । तेव्हां तयाचे दुकानावर । राजा नावेक स्थिरावला ॥ ११६ ॥ सावकाराचे दुकानीं । विक्री होतसे द्विगुणी । त्यानें भला माणूस जाणोनीं । आदर केला तयाचा ॥ ११७ ॥ मग व्यवहारी बोले भावें । तुम्हीं आतां मुखमार्जन करावें । जातीचे कोण आम्हां सांगावे । नाम ग्राम तुमचे पैं ॥ ११८ ॥ राजा म्हणे तया वैश्यासी । आम्ही क्षत्रिय असो परियेसीं । आमुचा मुलूख दूर देशी । क्षण एक येथें उतरलों ॥ ११९ ॥ मग सावकारें करविला पाक । अति उत्तम षड्रसादिक । भात पुऱ्या सांडगे देख । करविले बहुत प्रकार ॥ १२० ॥ मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया । उठा वेगीं जेवावया । भोजन करोनि लवलाह्या । मग जावें सुखरूप ॥ १२१ ॥ मग राव करी संध्यास्नान । सत्वर सारिता झाला भोजन । उत्तम प्रकारचें पक्वान्न । सेवूनि तृप्ति पावला ॥ १२२ ॥ तेव्हां वैश्य म्हणे क्षत्रियासी । सत्य सांगावे आम्हांसी । मग विक्रमें कथिलें तयासी । तेव्हां तो निज अंतरी समजला ॥ १२३ ॥ आतां त्या सावकाराची कन्यका । नाम तिचें अलोलिका । तिचा पण हाचि देखा । इच्छिला वर वरावा ॥ १२४ ॥ परि तिसी न मिळे इच्छावर । वैश्य शोध करी निरंतर । तंव हा विक्रमराजा परिकर । म्हणे यासी द्यावी कुमारिका ॥ १२५ तेव्हां तो बोले कुमारिकेसी । बाई उत्तम वर आणिला तुजसी । आता तूं माळ घालीं यासी । न करीं अनमान ॥ १२६ ॥ हा स्वरूपें आहे सुंदर । बत्तीसलक्षणी परिकर । हा भाग्यवंत जाण वर । यासी वरीं कुमारिके ॥ १२७ ॥ तेव्हां कुमारी बोले पित्यासी । तुम्ही बहुत वर्णितां यासी । परी न भरतां मम मानसीं । तंव न वरीं त्यासी निर्धारीं ॥ १२८ ॥ आज पाहीन याचें लक्षण । कैसें चातुर्य काय ज्ञान । भाषणावरूनि प्रमाण । सर्व कळों येईल ॥ १२९ ॥ ऐसें वदतां जाहली सांज । तंव अस्तासी गेला भानुराज । पित्यासि म्हणे महाराज । पांथिकासी पाठवावें ॥ १३० ॥ मग वैश्य म्हणे क्षत्रियासी । जावें निद्रा करावयासी । अति रम्य चित्रशाळेसी । तेथें सर्व विदित होईल ॥ १३१ ॥ मग तो विक्रम उठोनि चालिला । जेथें होती चित्रशाळा । तेथें हंस मयूर कोकिळा । नाना प्रकारचे लेपिले ॥ १३२ ॥ चित्रें रेखिलीं बहुकुशलता । वारू आणि गजरथा । चित्रकारें चित्र रेखितां । आळस कांही न केला ॥ १३३ ॥ पुढें पाहे राजा नयनीं । तंव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणीं । त्यावरी पासोडा लेप दोन्ही । आंथरुण घातलेंसे ॥ १३४ ॥ रत्नखचित सुरंग पलंग । त्यावरी नाना परींचे रंग । जाई जुई पुष्पें सुरंग । सेज केली अति निगुतीं ॥ १३५ ॥ वरतीं लोंबती मोतियांचे घड । चांदवा करीत फडफड । समया जळती धडधड । चतुष्कोणीं चार पैं ॥ १३६ ॥ ऐसें पाहूनि राव झाला चकित । म्हणे न कळे काय आहे वृत्तान्त । हा कोण देश कोणती गत । होईल ती कळेना ॥ १३७ ॥ कर्माच्या गति असती गहना । जें जें होणार तें कदा चुकेना । तें तें भोगिल्यावीण सुटेना । देवादिकां सर्वांसी ॥ १३८ ॥ तरी हें शनिदेवाचें छळण । तेणें ही माया रचिली जाण । आतां होणार तें होय आपण । जो सर्वांसी पीडीतसे ॥ १३९ ॥ ऐसा मनीं करोनि विचार । मग निद्रा करी राजेश्वर । तया पलंगीं साचार । सावधान निजे अंतरीं ॥ १४० ॥ नाना परींचे करी विचार । बुद्धीचे तरंग अपार । म्हणोनि निद्रा न ये साचार । परी मुख आच्छादन केलेसे ॥ १४१ ॥ रायें केली ऐसी परी । मग वैश्यकन्यका काय करी । पंचारती घेऊनि करीं । आली रंगमहालाकारणें ॥ १४२ ॥ तिने केला सर्व शृंगार । गळां शोभती मोतियांचे हार । केशर कस्तुरी कर्पूर । सुगंधद्रव्यें आणिली पैं ॥ १४३ ॥ पायीं पैंजण नुपूरें । तीं झणत्कार करिती गजरें । पदकांसी जडिले दिव्य हिरे । त्यांचे तेज फांकतसे ॥ १४४ ॥ ती जैसी पुतळीच केवळ । बत्तीसलक्षणी वेल्हाळ । मृगनयनी विशाल भाल । येऊनि उभी ठाकली ॥ १४५ ॥ राव निद्रेचें मिष करून । पलंगीं पहुडलासे जाण । तो न उठे ऐसें जाणोन । मग कुमारी काय करी ॥ १४६ ॥ चंदनपात्र घेऊनि हातीं । अलोलिका होय शिंपिती । तरी जागा न होय नृपती । कोणेही प्रकारे करोनी ॥ १४७ ॥ ऐसी एक प्रहर झाली कष्टी । जागा न होय मग झाली हिंपुटी । मुक्ताहार ठेवूनि खुंटी । निद्रा करी सचिंत ॥ १४८ ॥ तंव निद्रा आली कामिनीसी । मग राव उघडितां मुखासी । विचार करी निजमानसीं । मी सत्त्वधीर म्हणवितो ॥ १४९ ॥ परोपकारी माझें मन । पापास भितों रात्रंदिन । ही तंव कन्या असे जाण । कैसें भाषण करावें ॥ १५० ॥ ऐसा विचार करी निजमानसीं । तंव तो निद्राभर कामिनीसी । मग पाहतां झाला चित्रांसी । तेथें अपूर्व वर्तलें ॥ १५१ ॥ चित्रींचा हंस निर्जीव । परी तो काय करिता झाला लाघव । खाली उतरोनि सावयव । हारांची मोत्यें भक्षीतसे ॥ १५२ ॥ राव पाहूनि झाला चकित । मनीं म्हणें हे आश्चर्यमात । परी ही गोष्ट अनुचित । दुःखदायक आपणासी ॥ १५३ ॥ जरी हार घ्यावा काढूनी । तरी ब्रीद जातसे निरसूनी । परासी दुःख न द्यावें म्हणोनी । ब्रीद असे माझें हें ॥ १५४ ॥ परंतु गोष्टी हे अघटित । आपणासी दुःख होईल प्राप्त । ग्रहदशेचें मान सत्य । परी हार न काढावा ॥ १५५ ॥ ऐसा निश्चय रायें केला । इकडे सर्व हार हंसे गिळिला । तें पाहूनि राव निजला । कुमारिकेशेजारीं ॥ १५६ ॥ तंव उगवला असे दिन । कुमारी उठोनी खडबडोन । म्हणे हा पित्यानें वर आणिला जाण । अतिमूर्ख नपुंसक ॥ १५७ ॥ मनीं क्रोध आला भारी । उठोनि चालली झडकारी । तंव ती हार पाहे खुंटीवरी । तेथे कांही दिसेना ॥ १५८ ॥ हार न देखे कुमारिका । ती म्हणे पांथिका अविवेका । हार घेवोनि महाठका । निद्रा केली सुखरूप ॥ १५९ ॥ तरी हार देई माझा झडकरी । तुज पचणार नाहीं चोरी । ऐसिया गोष्टीनें तुझी थोरी । राहणार नाहीं तत्त्वतां ॥ १६० ॥ तरी हार दे माझा मजप्रती । मग त्वां जावें आपुल्या पंथीं । याची चर्चा झालिया निश्चितीं । नाश होईल शरीराचा ॥ १६१ ॥ तंव पांथस्थ म्हणे कुमारिका । हार नाहीं आम्हांसी ठाऊका । येथें निद्रा केली म्हणोनी देखा । आळ घालिसी आम्हांवरी ॥ १६२ ॥ तंव ती कुमारी संतप्त मनीं । पित्यासी सांगे तत्क्षणीं । म्हणे इच्छावर आणिला मजलागूनी । त्याचें लक्षण अति उत्तम ॥ १६३ ॥ तुम्हीं ठक चोर आणिला घरा । तो तस्करविद्येमाजीं पुरा । तेणें चोरिलें माझिया हारा । तरी तो मागूनि घेईजे ॥ १६४ ॥ तेव्हां वैश्य म्हणे पंथिकासीं । तुज विश्राम दिधला कासयासी । तरी तूं कां हार घेऊनि बैसलासी । बरा झालासी उतराई ॥ १६५ ॥ उत्तम भोजन दिधलें देखा । आणि ही अर्पिली निजकन्यका । ऐसे असतां महामूर्खा । काय आचरलासी ॥ १६६ ॥ बराच फेडिला उपकार । देई माझे कन्येचा हार । मग त्वां जावें सत्वर । आलिया पंथें ॥ १६७ ॥ तंव राव म्हणे सावकारासी । तुमचा हार नाही मजपाशीं । हा कर्मभोग ओढवला सायासीं । नसतेंचि विघ्न हें ॥ १६८ ॥ तेव्हां सावकारासी क्रोध आला । तेणें सेवकांसी हुकूम केला । बंधन करावें या तस्करास । मार द्यावा निष्ठुरपणें ॥ १६९ ॥ यासी मारिल्यावांचून । हार हस्तगत न होय जाण । हा पक्का चोर म्हणोन । ऐसें लक्षण पैं याचें ॥ १७० ॥ मग त्या सेवकीं धांवूनि सत्वर । बांधिला तो मुशाफर । अतिशय दिधला मार । दया नाहीं अंतरीं ॥ १७१ ॥ ते मारिती निष्ठुरी होऊनी । दया नाही अंतःकरणीं । मारा मारा ऐशा वचनीं । वैश्य तेव्हां बोलत ॥ १७२ ॥ मार मारूनि केला जर्जर । म्हणती हार देई गा सत्वर । महानिर्दय निष्ठुर । दया न ये कोणासी ॥ १७३ ॥ मग राव म्हणे वैश्यासी । हार नाहीं गा आम्हांपाशी । कष्टवितोसी शरीरासी । वृथाचि जाण कासया ॥ १७४ ॥ तैं वैश्य म्हणे सेवकांला । हा पक्का तस्कर नव्हे भला । अद्यापि नाहीं कबूल झाला । मार खातो निःशंक ॥ १७५ ॥ मग तो व्यवहारी काय करी । जाऊनि रायाचे दरबारीं । राया चंद्रसेना श्रुत करी । सांगे सकळ वर्तमान ॥ १७६ ॥ तें ऐकोनि राजेश्वर । म्हणे आणावा तो तस्कर । ऐसे वचन ऐकोनि सत्वर । सेवकांची मांदी धांवली ॥ १७७ ॥ त्यांनी बंधन करोनि विक्रमासी । आणिते जाहले रायापाशीं । मग प्रणिपात केला वेगेसीं । सन्मुख उभा राहिला ॥ १७८ ॥ मग राव बोले पंथिकासी । हार आहे कीं तुजपाशीं । तो देई आतां सावकारासी । प्राण वांचवी आपुला ॥ १७९ ॥ तंव विक्रम बोले वचना । ऐक राया चंद्रसेना । हार घेतला नाहीं जाणा । असत्य न बोलें कदाही ॥ १८० ॥ हाराचा सांगावा विचार । तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व । न घडे तोचि विचार । घडला असे समर्था ॥ १८१ ॥ आम्हांसी ग्रह नाहीं सानुकूल । नसतीच उत्पन्न होते कळ । त्याची काय करूनि हळहळ । होणार तें होतसे ॥ १८२ ॥ बरें चोरी न करावी परंतु केली । परी आतां पाहिजे क्षमा केली । सर्व अपराध पोटीं घालीं । कृपा करी महाराजा ॥ १८३ ॥ ऐसें वचन ऐकतां राजेश्वर । क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार । गर्जना करोनि सत्वर । काय बोलतां जाहला ॥ १८४ ॥ सेवकांसी म्हणे उठा सत्वर । तोडा याचे चरण कर । टाकूनि द्या नगराबाहेर । अन्न उदक न द्यावें ॥ १८५ ॥ ऐसा रायाचा अविवेक । मूढमती ते सकळिक । नाहीं कोणीही भाविक । यथा राजा तथा प्रजा ॥ १८६ ॥ तरी रायाचे मुखीं शनैश्चर । सुचूं न दे कांही विचार । तोचि पीडा करी वारंवार । दुःख देत रायातें ॥ १८७ ॥ ऐसें चंद्रसेनाचें उत्तर ऐकोनी । सेवक उठले झडकरोनी । राया विक्रमासी चालिले घेऊनी । तया नगराबाहेरी ॥ १८८ ॥ नेऊनिया नगरप्रदेशीं । तोडिते झाले करचरणांसी । अश्रु येती जनांच्या नयनांसी । महासंकट ओढवलें ॥ १८९ ॥ तेव्हा हात पाय चारी । तोडिले त्याचे निष्ठुरीं । टाकोनि ग्रामाबाहेरी । सेवक गेले सांगावया ॥ १९० ॥ मग राजा पुसे सेवकांला । तो मेला किंवा वांचला । त्याचा प्राण कोठें उरला । ऐसे बोले उत्तर ॥ १९१ ॥ मग सेवक म्हणती महाराज । सत्वरचि प्राण जाईल सहज । करचरणांवीण आत्मराज । कैसें सुख पावेल ॥ १९२ ॥ खाण्यावीण हैराण । शरीरीं पीडा अतिदारुण । तळमळ करी रात्रंदिन । महादुःख होतसे ॥ १९३ ॥ इकडे राजा विक्रम काय करी । हातपायांचे दुःख भरी । जैसा मत्स्य तळमळ करी । उदकावीण जाण पां ॥ १९४ ॥ कोणी येताती वाटसरू । त्यांसी पाहतां येत गहिंवरू । ते म्हणती हे परमेश्वरू । कोण कष्ट या प्राणियासी ॥ १९५ ॥ जरी अन्न उदक कोणी द्यावें । तरी रायें त्यांसी दंडावें । ताडन बंधन करावें । ऐसा धाक जनांसी ॥ १९६ ॥ ऐसें असतां जाहला एक मास । अति दुःख होतसे विक्रमास । परी दया न ये कोणास । ग्रहदशा म्हणवोनी ॥ १९७ ॥ राव विक्रम शोक करी । म्हणे ग्रहा समर्था कृपा करी । निष्ठुर न व्हावें निजांतरीं । दया करीं दीनासी ॥ १९८ ॥ ऐसी करुणा भाकितां तये वेळीं । मग शनैश्वरासी कृपा आली । म्हणे याच्या सत्त्वाची न कळे खोली । सीमा झाली तत्त्वतां ॥ १९९ ॥ तरी आतां पीडूं नये तत्त्वतां । केली रायाच्या मनीं प्रेरकता । चंद्रसेन द्रवला चित्ता । म्हणे अन्नउदक देत जावें ॥ २०० ॥ अन्नउदकाची आज्ञा जाहली । नगरजनांसी दया आली । ते आणोनि देती नित्यकाळीं । कनवाळू कृपाळू जन ॥ २०१ ॥ अन्नउदकाचा होतसे सुकाळ । परंतु करचरणांवीण पांगुळ । त्या अतिदुःखें होतसे विकळ । चैन न पडे क्षणभरी ॥ २०२ ॥ ऐशीं क्रमिली वर्षे दोन । तोंवरी दुःख सोशिलें अति दारुण । ऐसें कर्माचे विंदान । भोगल्यावीण सुटेना ॥ २०३ ॥ तंव कोणे एके दिवशीं । तेलीण बैसोनि शिबिकेसी । जात होती सासुऱ्यासी । तया मार्गांने ॥ २०४ ॥ त्या तेलिणींचें माहेर । होतें पैं उज्जयिनीनगर । सासरें तामलिंदापुर नगर । ऐसें श्रोती जाणावें ॥ २०५ ॥ तेथील तेलियांने उज्जयिनीहूनी । स्नुषा आणिली मूळ करोनी । तंव ती त्या मार्गावरोनी । येत होतीं उभयतां ॥ २०६ ॥ तेव्हा त्या तेलिणीनें । पाहिलें विक्रमाकारणें । मनीं म्हणे राजा कोणें । आणिलासे या स्थानीं ॥ २०७ ॥ मग ती खालीं उतरोनी कामिनी । लागली विक्रमाच्या चरणीं । म्हणे हातांपायांवांचोनी । कोण अवस्था शरीराची ॥ २०८ ॥ राजा अवलोकी तेलिणीकडे । बाई विजयी असोत तुझे चुडे । काय वृत्तान्त ग्रामाकडे । तो सर्व सांग मज ॥ २०९ ॥ मग कामिनी म्हणे आहो राया । सर्व सुखी आहेत करुणालया । परी हे अवस्था तुमच्या देहा । काय म्हणोनी जाहली ॥ २१० ॥ राव म्हणे ऐक पतिव्रते । हा कर्मभोग जाण निरुतें । ग्रहदशा फिरली मातें । कर्तृत्व देवाचें ॥ २११ ॥ मग सर्व सांगितलें तियेसी । जें जें वर्तलें ज्या समयासी । तें ऐकोनि म्हणे विक्रमासी । धन्य धन्य रे विधातिया ॥ २१२ ॥ मग ती तेलीण काय करत । रायासी शिंबिकेमाजी बैसवीत । आपुल्या गृहासी घेऊनि जात । अत्यादरेंकरोनिया ॥ २१३ ॥ तंव तो तेली कांपे थरथरां । म्हणे हें विघ्न आणिलें घरा । जरी श्रुत होईल राजेश्वरा । मग कैसें करावें आपण ॥ २१४ ॥ तेव्हां सून म्हणे श्वशुरासी । हा विक्रमादित्य निश्चयेंसीं । धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी । परि हे दशा ग्रहाची ॥ २१५ ॥ हा माळवा देशींचा धनी । जैसा उकिरड्यांत पडिला चिंतामणी । दैवें लाधला आपणालागूनी । म्हणोनि आला गृहातें ॥ २१६ ॥ मग तो तेली काय करी । राया चंद्रसेना श्रुत करी । आपण तस्कर टाकिला जो बाहेरी । हस्तपाद खंडोनी ॥ २१७ ॥ जरी आज्ञा होईल राजेश्वरा । तरी आणीन तया तस्करा । दया उपजली मम अंतरा । दीन अनाथ म्हणवोनी ॥ २१८ ॥ मग राव म्हणे भला रे भला । आणावें तया तस्कराला । प्रतिपाळ करीं वहिला । अन्नवस्त्र देऊनी ॥ २१९ ॥ ऐसा हुकूम केला रायानें । मग तेली आला घराकारणें । तेव्हां तेलियासी विक्रम म्हणे । गोष्ट सांगतो ऐका ते ॥ २२० ॥ मग राव म्हणे मेहतरासी । तुम्हीं श्रुत न करावें कोणासी । विक्रम आहे मम गृहासी । ऐसें कोठें न वदावें ॥ २२१ ॥ मग तो तेली म्हणे राजेश्वरा । घाणा हांकावा माझिया घरा । देईन मी अन्न आणि वस्त्रा । ऐसा नेम पै माझा ॥ २२२ ॥ मग विक्रम म्हणे तेलियासी । धन्य तुझी बुद्धि ऐसी । तुझा उपकार न फिटे आम्हांसी । महासंकटी रक्षिलें ॥ २२३ ॥ ऐसें करितां कांहीएक दिवस । होते झाले विक्रमास । तया तेलियाचे घरी रात्रंदिवस । घाणा हांकीतसे ॥ २२४ ॥ तंव सात वर्षे परिपूर्ण झालीं । पुढें कथा कैसी वर्तली । ते पहिजे श्रवण केली । एकाग्रचित्तेंकरोनियां ॥ २२५ ॥ मग कोणे एके दिवशी । सायंकाळ जाहली निशी । घाण्यावर असतां विक्रमासी । बुद्धि कैसी आठवली ॥ २२६ ॥ तो दीपरागाचा अवसर । ध्यानांत आणी राजेश्वर । राग आळवीतसे मधुर । सुस्वर कंठेंकरोनी ॥ २२७ ॥ रागोद्धार करितां प्रत्यक्ष । दीप लागले लक्षानुलक्ष । जैसी दीपावलीच देख । प्रकाशमान नगरांत ॥ २२८ ॥ तंव एकस्तंभाच्या माडींत । राजकन्या अतिरूपवंत । नामें पद्मसेना निश्चित । बैसलीसे आनंदें ॥ २२९ ॥ तेव्हा तिनें अवलोकिला प्रकाश । मग पाचारिलें परिचारिकेस । म्हणे कोणें केलें दीपोत्सवास । शोध करोनि मग सांगा ॥ २३० ॥ दीपावली तों आज नाहीं । आणि लग्नही नसे कोठेंही । तरी हें आश्चर्य दिसतें कांही । पाहूनि यावें सत्वरी ॥ २३१ ॥ इकडे दीपराग झाला संपूर्ण । तेव्हा दीप मावळले मुळींहून । मग दुसरा श्रीराग नामेंकरून । तेथें राग आळवीतसे ॥ २३२ ॥ पद्मसेना पुसे परिचारिकेसी । हा पुरुष रागज्ञानी विशेषीं । राग आळवितो अति सुरसीं । कोण्या स्थळीं पहा गे ॥ २३३ ॥ याचा आणावा समाचार । धुंडाळावे सकळ नगर । जेथें असेल तो नर । येथे आणा वेगेंसी ॥ २३४ ॥ तेव्हां परिचारिका चौघीजणी । नगरीं शोध करिती तत्क्षणीं । तंव तो तेलियाच्या घरीं घाणी । हांकीतसे चौरंगा ॥ २३५ ॥ त्या परतोनि राजकन्येसी सांगती । कीं चौरंगा केला जो निश्चितीं । तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती । घाणा हांकीत बैसला ॥ २३६ ॥ तोचि करीत आहे रागरंग । परी स्वरूप दिसताहे बेढंग । जैसें कां शिमग्याचे सोंग । ऐसियापरी दिसताहे ॥ २३७ ॥ मग पद्मसेना म्हणे साचार । तरी घेऊनि या तो तस्कर । जीवें भावें करीन भ्रतार । वेध लागला अंतरीं ॥ २३८ ॥ परिचारिका म्हणती प्रमाण । परी राया श्रुत करावें जाण । म्हणजे न लागे दूषण । शब्द न ये आम्हांवरी ॥ २३९ ॥ तेव्हां पद्मसेना म्हणे तुम्हांसी कायी । तयासी येथे आणावें पाहीं । मग रायासी श्रुत करीन लवलाहीं । तुम्ही मनीं भिऊं नका ॥ २४० ॥ तेव्हां परिचारिका निघाल्या तेथुनी । येत्या झाल्या तेल्याचे दुकानीं । मग त्या तेलियासी पुसोनी । तयासी घेऊनि चालिल्या ॥ २४१ ॥ एकस्तंभाच्या माडीवरी । तयासी नेलें पैं सत्वरीं । मग त्यातें अवलोकूनि राजकुमारी । परम अंतरीं संतोषली ॥ २४२ ॥ मग ती वदे चौरंगासी । तुम्ही रागज्ञानी अतिविशेषीं । तरी आतां रागोद्धार करावा वेगेसीं । जेणे तृप्त होती श्रवण हे ॥ २४३ ॥ मग तो करी रागोद्धार । यथान्याय गातसे सुस्वर । कंठ त्याचा अति मधुर । जैसा गंधर्व दुसरा ॥ २४४ ॥ ऐसा राजकन्येच्या माडीवर । रागरंग होतसे अपार । तंव चंद्रसेन आपुल्या माडीवर । ऐकता जाहला ॥ २४५ ॥ मग राव पुसे परिचारिकेसी । आजि कुमारिकेच्या महालासी । रंग होतो दिवसनिशीं । कोणे कार्यासी सांग पां ॥ २४६ ॥ मग दासी म्हणती समर्था । हा अन्याय आम्हांसी लावितां । परी हे निजकन्येची अवस्था । आम्हांकडे काय शब्द ॥ २४७ ॥ परंतु आमुची एक विनवणी । येऊनि पाहावें निजनयनीं । मग येईल कळोनी । सर्व अवस्था तेथील ॥ २४८ ॥ पद्मसेनेचा विचार । आम्हां सांगतां न ये साचार । म्हणोनि तेथें चलावें सत्वर । मग जें करणें तें करावे ॥ २४९ ॥ तंव त्या रायासी निद्रा आली । पुढें कथा कैसी वर्तली । ती पाहिजे श्रवण केली । एकाग्रचित्तेकरोनिया ॥ २५० ॥ राजा विक्रम त्या माडीवर । बैसलासे चिन्तातुर । तंव साडेसात वर्षे साचार । भरलीं शनिदेवाचीं ॥ २५१ ॥ राजा मनीं चिन्ता करीत । म्हणे केव्हां उज्जयिनी होईल प्राप्त । क्लेश भोगिले अत्यंत । परी कृपा न करी ग्रहस्वामी ॥ २५२ ॥ ऐसा राव चिंता करीत । तंव तेथें काय वर्तली मात । शनिदेव होऊनि कृपावंत । सन्मुख उभा ठाकला ॥ २५३ ॥ म्हणे ऐक राया विक्रमसेना । मज न ओळखसी अज्ञाना । अद्यापि अनुभव तव मना । आला किंवा नाहीं ॥ २५४ ॥ मग राव ऊर्ध्व पाहे झडकरोन । परि ते नाहीत करचरण । तेव्हां तैसाचि भूमिशयन । लोटांगण घालीतसें ॥ २५५ ॥ तेव्हां शनि म्हणे राया विक्रमा । धन्य धन्य तुझा महिमा । आतां मी प्रसन्न राजोत्तमा । इच्छा असेल तें माग ॥ २५६ ॥ तंव विक्रम सद्गद बोले वचन । म्हणे मनुष्यदेहा न पीडीं जाण । हेंचि द्यावें मज दान । कृपाळुवा शनिदेवा ॥ २५७ ॥ म्यां दुःख सोशिलें अनिवार । ऐसें प्राण्यांसी नाहीं सोंसवणार । तरी तूं कोणासी न पीडीं साचार । हेंचि मागणें शनिदेवा ॥ २५८ ॥ ऐसें ऐकोनि शनिदेव । म्हणे धन्य धन्य तूं विक्रमराव । परपीडेचा अनुभव । जाणतोसी निजांतरी ॥ २५९ ॥ तूं न मागसी हातपाय । राजछत्रादि सुखोपाय । तरी तुज ईश्वर म्हणों ये । परमदुःख निवारिसी ॥ २६० ॥ मग कृपा उपजली शनिदेवासी । रावीं करचरणादि रूपासी । पहिल्याहूनी अति विशेषीं । सुंदर काया पैं केली ॥ २६१ ॥ मग राव शनिदेवाचे चरण धरी । म्हणे कृपाळुवा कृपा करीं । हेंचि मागणें साचारीं । न करीं पीडा कोणासी ॥ २६२ ॥ मग रायाते शनिदेव बोले । म्या काय तुज दुःख दिधलें । दुःख गुरुनाथें पाहिलें । ते कष्ट कोणे रीतीं ॥ २६३ ॥ तुज दुःख दाविलें किंचित । म्यां कैसे त्रासिले देवदैत्य । तें श्रवण करीं निश्चित । गुरुपीडा अवधारी ॥ २६४ ॥ एके दिवशी प्रातःकाळीं । नमन केलें गुरुमाऊली । मग हस्त जोडोनि ते वेळीं । विनंती करीं तयासी ॥ २६५ ॥ अहो जी श्रीगुरुनाथा । मी तुमच्या राशीसी येतों आतां । तरी मान्य करीं कृपावंता । साडेसात वर्षांते ॥ २६६ ॥ मग गुरु म्हणे गा मजसी । तुम्हीं कृपा करावी आम्हांसी । न यावें आमुच्या राशीं । घडी एक जाण पां ॥ २६७ ॥ मग मी वदलो तें वेळां । तुम्ही करितां माझा कंटाळा । तरी मज थारा नाहीं दयाळा । कोणी न करी मान्य मज ॥ २६८ ॥ तरी पांच वर्षे मान्य करीं । अथवा अडीच वर्षे पदरीं धरीं । अडीचा वर्षांची परी । थोडकीच असे ॥ २६९ ॥ परी तें न मानीच गुरू । मग मी म्हणे न घडे निर्धारू । पुन्हां मनीं केला विचारू । कीं गुरुसी न गांजावें ॥ २७० ॥ गुरु केवळ माऊली । सदा कृपेची करी साऊली । गुरुवचन न मानितां ये वेळीं । अधःपात प्राप्त होय ॥ २७१ ॥ ते वेळां मी लागलों चरणीं । विनंती करीत विनीत वचनीं । मी प्रसन्न तुज ग्रह शनी । माग माग गुरुनाथा ॥ २७२ ॥ तेव्हां गुरु म्हणे शनैश्चरा । आम्हांवरी कृपा करा । न यावें आमुच्या शरीरा । हेंचि आतां मागतसें ॥ २७३ ॥ मग मी प्रसन्न जाहलों ते क्षणीं । साडेसात प्रहर येतो म्हणोनी । तुम्हीं मान्य न मानिती मजलागीं ॥ २७४ ॥ मग गुरुदेव म्हणे प्रमाण । तरी सवा प्रहर येणें जाण । तें म्या मान्य केलें वचन । मग आज्ञा दिधली गुरूनें ॥ २७५ ॥ गुरु विचार करी निजमानसीं । स्नानसंध्यादि स्वकर्मासी । करितां दवडीन सव्वा प्रहरासी । मग तो शनि काय करील ॥ २७६ ॥ ऐसा गर्व धरिला मनांत । तो मज कळला वृत्तांत । मग म्यां विचारिलें चित्तांत । कांही चमत्कार दाखवू ॥ २७७ ॥ तंव तें आली ग्रहाची वेळ । तेव्हां गुरु जाहला उतावेळ । म्हणे मृत्युलोकीं गंगाजळ । तरी स्नानालागीं पैं जावें ॥ २७८ ॥ शनिग्रहाची पडता छाया । तेव्हां पालटली गुरूची काया । मग फकीरवेषें तया ठाया । शनैश्वर पातला ॥ २७९ ॥ तयापासीं खरबुजें होतीं दोन । तीं केली गुरुसी अर्पण । मग गुरु हर्षयुक्त होऊन । दोन पैसे देत तया ॥ २८० ॥ मग स्नान करोनि ते वेळी । धोतरांत फळें बांधिली । झारी शोभे करकमळी । चालिले ते मार्गानें ॥ २८१ ॥ तंव पुढें दिसे एक नगरी । तेथें काय झाली परी । राव प्रधान समसरी । दोन पुत्र दोघांसी ॥ २८२ ॥ ते उभयतां त्या दिवशीं । गेले होते शिकारीसी । दोन प्रहर झाले तयांसी । वाट पाहे राजेंद्र ॥ २८३ ॥ तंव ते येतां दिसेना । इकडे उशीर जाहला भोजना । तेव्हां सेवकांसी केली आज्ञा । धुंडूनि आणा दोघांसी ॥ २८४ ॥ मग ते सेवक निघाले सत्वर । लगबगा आले गांवाबाहेर । तंव तो पुढें देखिला विप्र । हातीं झोळी खरबुजांची ॥ २८५ ॥ तंव शनैश्चरें केली माव । फळांची मस्तके जाहलीं सावयव । सेवकीं ओळखिला ब्रह्मदेव । म्हणती तुम्हांपासी काय आहे ॥ २८६ ॥ ब्राह्मण म्हणे सेवकांसी । खरबुजें घेतलीं फराळासी । सेवक म्हणती रुधिरासी । स्राव होते दिसताहे ॥ २८७ ॥ तूं ब्राह्मण किंवा शूद्र । वस्त्रांतून गळे रुधिर । काय आहे तें सत्वर । दाविजे पैं आम्हासी ॥ २८८ ॥ मग गुरु झाला भयभीत । म्हणे हे अघटित काय वदत । अधोदृष्टि झोळी पाहात । तंव तें रुधिर प्रत्यक्ष ॥ २८९ ॥ सेवक झोळी घेती हिरोन । मग ते पाहती सोडोन । तंव शिरकमळे निघालीं दोन । प्रधान राजपुत्रांचीं ॥ २९० ॥ सेवक म्हणती रे चांडाळा । महादुष्टा पतिता खळा । ब्रह्मवंशी अमंगळा । दया नाहीं तुज अंतरीं ॥ २९१ ॥ मग ते क्रोधयुक्त मानसीं । बंधन करिती ब्राह्मणासी । मारीत मारीत तयासी । रायापाशीं आणिला ॥ २९२ ॥ राया सन्मुख उभा करून । सेवक सांगती वर्तमान । हा बाळहत्यारी ब्राह्मण । यानें उभयतांसी मारिलें ॥ २९३ ॥ ऐकतांचि रायासी आली मूर्छना । मनीं म्हणें कैसें केलें नारायणा । एक पुत्र होता तोही मना । नाहीं आला तुझ्या कीं ॥ २९४ ॥ ब्राह्मण नोहे हा काळ । यानें गिळिला माझा बाळ । तरी यासी नेऊनि तत्काळ । सुळावर देईजे ॥ २९५ ॥ ऐसा हुकूम होतां रायाचा । सूळ करविला लोखंडाचा । नेऊनि रोविला पैं साचा । नगराबाहेरी ॥ २९६ ॥ तंव भृगूचिया मंदिरांत । वर्तमान झालें श्रुत । तेव्हां एकचि वर्तला आकांत । तो लिहितां ग्रंथ विस्तारेल ॥ २९७ ॥ परि राजपुत्राची कामिनी । पतिव्रता लावण्यखाणी । वार्ता ऐकतां तत्क्षणीं । सती जावया सिद्ध जाहली ॥ २९८ ॥ आतां इकडे गुरुनाथासी । घेऊनि गेले सुळापाशीं । तेव्हां न सुचे कांही गुरूसी । ग्रहदशेने वेष्टिलें ॥ २९९ ॥ मग गुरु वदे सेवकांला । आतां सुळीं न द्यावें आम्हांला । दहा सहस्र रुपये तुम्हांला । देतों क्षणभरी थांबावे ॥ ३०० ॥ दोन घटिका आम्हांसी । सुळीं न द्यावें निश्चयेसीं । मग अवलोकावें नेत्रेंसीं । कैसें होईल तें ॥ ३०१ ॥ ऐसे करुणाशब्द बोलतां तयां । मग त्या सेवकांसी आली दया । तेव्हां ते म्हणती दोन घटिका थांबोनियां । मग देऊं सुळावरी ॥ ३०२ ॥ ऐसें बोलतां बोलतां जाण । सव्वा प्रहर झाला परिपूर्ण । प्रधान राजपुत्र दोघेजण । वारूंसहित पातले ॥ ३०३ ॥ जेणें रायासीं जाणविलें । त्याचे दारिद्र दूर केलें । मग सेवकांसी आज्ञापिलें । सुळीं न द्यावें ब्राह्मणा ॥ ३०४ ॥ तेव्हां सेवक धांवले सत्वर । येऊनि नगराबाहेर । सांगितला समाचार । सुळीं न द्यावे ब्राह्मणा ॥ ३०५ ॥ मग तो आणिला रायापाशी । उभा राहिला सन्मुखेंसी । आशीर्वाद देऊनियां रायासी । आपुला वृत्तान्त निवेदिला ॥ ३०६ ॥ ऐकोनि राव झाला सद्गदित । म्हणे मज नव्हतें विदित । मी दूषण लावोनि वधीत । होतो तुम्हां गुरुराया ॥ ३०७ ॥ धिक् धिक् हा संसार । मी महापापी अनिवार । केवढा केला अविचार । राज्यमदेंकरोनियां ॥ ३०८ ॥ तेव्हां सद्गदित झाला नृपती । गुरुचरण धरिलें प्रीतीं । स्फुंदस्फुंदोनि रडे निश्चितीं । मी अपराधी गुरुराया ॥ ३०९ ॥ नेणतपणें जाहला अविचार । तो क्षमा करीं साचार । मग हात धरोनि सत्वर । सिंहासनीं बैसविला ॥ ३१० ॥ मग गुरु म्हणे ऐक भूपाळा । हा अन्याय नाहीं तुजला । ही शनैश्वराची कळा । दुःख दाविलें तयानें ॥ ३११ ॥ मग झोळी आणोनि पाहती । तंव खरबुजेंच दिसतीं । शिरकमळाची आकृती । अदृश्य जाहली तत्काळ ॥ ३१२ ॥ असो रायें करविलें भोजन । गुरुपंक्तीस बैसला आपण । आणखीही दिव्य ब्राह्मण । सर्वही तृप्ति पावले ॥ ३१३ ॥ मग गुरूसी वस्त्रे भूषणें । दिधलीं राया भृगूनें । तेव्हां आज्ञा घेऊनि गुरूनें । प्रयाण केलें तेथोनी ॥ ३१४ ॥ मग शनिदेव आले गुरूपाशीं । नमन केलें साष्टांगेसीं । म्हणे वर्तणूक जाहली कैसी । ती सांगावी गुरुनाथा ॥ ३१५ ॥ गुरू म्हणे बापा शनैश्चरा । सव्वा प्रहरांत केला माझा मातेरा । साडेसात वर्षी येतासी खरा । तर मग काय होतें कळेना ॥ ३१६ ॥ तूं ग्रहांमाजी ग्रह श्रेष्ठ । जीवांसी देसी बहु कष्ट । मी गुरु तुज अति श्रेष्ठ । बरा उपकार फेडिला ॥ ३१७ ॥ असो जें जाहले तें बरें झालें । परी ऐसें कोणा न कष्टवीं वहिलें । तुज शपथ माझी ये वेळे । शनिग्रहा समर्था ॥ ३१८ ॥ मग शनिदेव म्हणे गुरूसी । गर्व न धरावा मानसीं । गर्व धरील त्या पुरुषासी । ऐसेंच मी गांजीन ॥ ३१९ ॥ गुरुजी तुम्हांसी गर्व जाहला । म्हणोनि हा अपराध घडला । तरी क्षमा करा बाळकाला । अपराध पोटीं घालिजे ॥ ३२० ॥ मग शनि गेला शिवापाशीं । म्हणे आतां येतों तुम्हांसी । तंव शंभु म्हणे आम्हांसी । काय करिसी येऊनियां ॥ ३२१ ॥ परी येशील तेव्हां सांगून येणें । ऐसें उभयतां झालें बोलणें । मग दुसरें दिवशीं शनीनें । येतों म्हणोनि सुचविलें ॥ ३२२ ॥ शंकरें ऐकोनि वचनासी । क्षण एक लपला कैलासीं । मग वदता झाला शनीसी । तुवां आमुचें काय केलें ॥ ३२३ ॥ मग शनि म्हणे महादेवा । तुमचा धाक त्रिभुवनीं सर्वां । मजभेणे लपलेती देवाधिदेवा । हें काय थोडें असे ॥ ३२४ ॥ ऐकोनि हास्य करी कैलासराज । म्हणे धन्य तुझें उग्र तेज । मग कृपा करून सहज । आज्ञा देत शनीला ॥ ३२५ ॥ मग ग्रह आला रामचंद्रासी । वनवास भोगविला तयासी । मग ग्रह येतां सीतेसी । रावणें चोरून पैं नेलें ॥ ३२६ ॥ रावणाच्या मंचकाखालते । नवग्रह होते पालथे । त्यावरी मंचक ठेवूनि निरुतें । रावण पहुडे नित्यकाळीं ॥ ३२७ ॥ मग तेथें आले नारदमुनी । ते वदते झाले मजलागूनी । तूं ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी । ऐसी दशा तुमची ॥ ३२८ ॥ तरी येथें तुमचें कांही न चाले । गरिबांस कष्टवितां बळें । हे सामर्थ्य नव्हे आगळें । उगाची पुरुषार्थ भोगितां ॥ ३२९ ॥ मग शनि वदे नारदासी । आम्ही पालथे ते सोयींचे करविसी । मग पाहें पराक्रमासी । कैसा आहें तो दावीन ॥ ३३० ॥ नारद म्हणे मी ऐसें करीन । ऐसें बोलोनिया वचन । मग रावणापाशी जाऊन । सांगे तयासी विचार ॥ ३३१ ॥ म्हणे ग्रह पालथे घालून । मंचकी निद्रा करिसी रात्रंदिन । तरी हें अनुचित असे जाण । वैरियांच्या उरावरी पाय द्यावा ॥ ३३२ ॥ तें वचन रावणा मानलें । मग पालथे ते सोयीचे केले । तंव तेथें काय वर्तलें । तें परिसावें सज्जनीं ॥ ३३३ ॥ दृष्टि फिरवितां शनैश्चर । षण्मासांत सहपरिवार । निर्दाळी श्रीरामचंद्र । पुत्रपौत्रांसहित पैं ॥ ३३४ ॥ हरिश्चंद्रासी आला शनी । बारावा अतिक्रूर स्थानीं । पीडिता झाला कौशिकमुनि । राज्यभ्रष्ट तो केला ॥ ३३५ ॥ पुढें अति दुःख दिधलें तयासी । स्त्रीपुत्रादि घातले विक्रयासी । स्वयें विकला डोंबासी । तेथेंहि जाचिलें बहुत ॥ ३३६ ॥ ऐसें कष्टविले राजोत्तमा । दमयंतीप्राणमनोरमा । दुःख दिधलें हे विक्रमोत्तमा । पीडियेली दमयंती ॥ ३३७ ॥ ग्रह आला इंद्रराया । भोगिली गौतमाची जाया । भगांकित झाली सर्व काया । ऋषिशापेंकरोनिया ॥ ३३८ ॥ ग्रह आला चंद्रासी । स्पर्श केला गुरुपत्नीसी । कलंक लागला चंद्रासी । ऐसें झालें जाण पां ॥ ३३९ ॥ ग्रह आला वसिष्ठासी । क्षय झाला शत पुत्रांसी । तैसेंचि पीडिलें पराशरासी । मत्स्यगंधा भोगिली ॥ ३४० ॥ पांडव ग्रहदशा भोगित । राज्य हरोनि गेले वनांत । कौरवांचा क्षय केला क्षणांत । ग्रह येतांचि तत्काळीं ॥ ३४१ ॥ तैसाचि श्रीकृष्णासी ग्रह आला । स्यमंतकाचा डाग लागला । तो कोणत्या कारणें निघाला । हरिविजयीं ती कथा ॥ ३४२ ॥ मग कृष्ण म्हणे शनैश्चरा । तूं महासमर्थ होसी खरा । सर्वत्रांसी तुझा दरारा । देवदानवांदिकांसी ॥ ३४३ ॥ ऐसें देवादिकांसी त्रासिलें । त्यांत तुजला कांहीसें दुःख दिधलें । किंचित् चमत्कारासी दाविलें । समजावया तुजलागीं ॥ ३४४ ॥ मग विक्रम उठे झडकरी । साष्टांग नमस्कार करी । धन्य शनैश्चरा अवधारीं । पावन केलें मजलागीं ॥ ३४५ ॥ आतां मी तुज अनन्यशरण । कृपा करीं अनाथागून । हेंचि द्यावे वरदान । न पीडीं प्राणिमात्रासी ॥ ३४६ ॥ मग शनि म्हणे विक्रमासी । धन्य तू परोपकारी होसी । परपीडा निवारितोसी । उपमा नाहीं तुजलागीं ॥ ३४७ ॥ तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर । रायासी देता झाला निजवर । हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर । तयासी पीडा न करीं मी ॥ ३४८ ॥ भावें करितां श्रवण पठण । आदरें ग्रंथसंरक्षण । त्यासी रक्षींन मी रात्रंदिन । कृपा करीन सर्वथा ॥ ३४९ ॥ जो कां श्रवण पठण न करी । आणि ग्रंथांची हेळणा करी । तया नराच्या शरीरीं । पीडा फार करीन मी ॥ ३५० ॥ श्रवणपठणाचा ऐका विचार । नित्य अथवा शनिवार । श्रवण पठण करी जो नर । उपोषणें अतिसंतोषें ॥ ३५१ ॥ जरी न करवे उपोषणासी । तरी श्रवण करावें अहर्निशी । तेणें संतोष मम मानसीं । मग पीडा न करीं तत्त्वतां ॥ ३५२ ॥ हें वचन माझें नेमस्त । विक्रमासी भाष देत । त्या नरासी मी भाग्यवंत । करीन जाण निर्धारें ॥ ३५३ ॥ ऐसा वर देऊनि रायासी । शनिदेव गेले निजस्थानासी । पुढें कथा वर्तली कैसी । ती श्रवण करावी श्रोतेहो ॥ ३५४ ॥ राजकन्येच्या माडीवर । विक्रमासी भेटले शनैश्चर । तेव्हा रायाचें दिव्य झालें शरीर । जैसा सूर्य प्रकटला ॥ ३५५ ॥ तंव चंद्रसेन राव आला । पाहे तंव देखे विक्रमाला । जैसा मदनाचा पुतळा । तटस्थ जाहला मानसीं ॥ ३५६ ॥ मग ते पद्मसेना राजकुमारी । राया विक्रमातें वरी । राव पुसे ते अवसरीं । आपण कोण महाराज ॥ ३५७ ॥ विक्रम वदे साचार । मी तुमचा असे चोर । श्रीपति वैश्य सावकार । बोलवा आधीं तयासी ॥ ३५८ ॥ तंव ते धावली सेवकांची मांदी । वैश्य बसला होता गादी । म्हणती बोलविलें रायें आधीं । सत्वर तेथें चलावें ॥ ३५९ ॥ वैश्य उठला झडकरोन । येऊनि रायासी करी नमन । राव म्हणे वैश्यालागून । हाचि तस्कर होय कीं ॥ ३६० ॥ वैश्य म्हणे रायासी । आतां चला मम मंदिरासी । अवश्य म्हणोनि वेगेंसीं । चित्रशाळेसी पातले ॥ ३६१ ॥ तंव चित्रींचा निर्जीव हंस । जेणें गिळिलें होतें हारास । तो पुनः उगाळी सावकाश । जैसा होता तैसाचि ॥ ३६२ ॥ हार उगाळितां हंसानें । तो पाहिला सर्वजनें । हें आश्चर्य सकळांकारणें । म्हणती हें अघटित ॥ ३६३ ॥ मग तो वैश्य वाणी । बहु संतोषला निजमनीं । कन्या अर्पूनि चरणीं । विक्रमाच्या लागला ॥ ३६४ ॥ जन म्हणती अघटित कला । निर्जीव लेपें हार गिळिला । दोष लाविला महापुरुषाला । तें आजि कळों आलें ॥ ३६५ ॥ चंद्रसेन पुसे विक्रमासी । आपण राहतां कोणे देशीं । कोण नाम कोणे वंशीं । जन्म तुमचा सांगावा ॥ ३६६ ॥ तंव विक्रम म्हणे चंद्रसेना । काय पुससी विचक्षणा । मी असें उज्जयिनीचा राणा । नाम माझें विक्रम ॥ ३६७ ॥ ऐसें ऐकतां राजेश्वर । घाली साष्टांग नमस्कार । म्हणे अन्याय घडला थोर । कृपा करीं दयाळा ॥ ३६८ ॥ तेव्हांच की असतें श्रुत । तरी कष्ट कां होते प्राप्त । न कळतां झालें अनुचित । त्यासी उपाय कायसा ॥ ३६९ ॥ विक्रम म्हणे राजेश्वरा । हा आमुच्या ग्रहदशेचा फेरा । पूजन न केलें शनैश्चरा । म्हणोनि कष्ट पावलों ॥ ३७० ॥ तंव ग्रह नव्हता सानुकूळ । म्हणोनि तव बुद्धि विकळ । आतां ग्रह झाला सानुकूळ । म्हणोनि ऐसें वदतोसी ॥ ३७१ ॥ असो रायानें सोहळा केला फार । फोडिलें द्रव्याचें भांडार । धर्म केला अपार । याचकजन संतोषती ॥ ३७२ ॥ मग तो तेली बोलाविला । विक्रमें तयासी नमस्कार केला । एक देश तया देवविला । सुखी केला तये वेळीं ॥ ३७३ ॥ चंद्रसेन हर्षभरित । म्हणे मम भाग्यासी नाहीं अंत । विक्रम जोडला जामात । धन्य मी एक संसारी ॥ ३७४ ॥ ऐसें करितां एक मास । झाला राया विक्रमास । मग पुसोनियां चंद्रसेनास । आज्ञा मागतसे नृपती ॥ ३७५ ॥ मग चतुरंग दळ सिद्ध करून । हत्ती घोडे दासदासी जाण । देश पट्टणें ग्राम देऊन । जामातासी बोलविलें ॥ ३७६ ॥ तंव त्या सावकारें आपण । नाना वस्तु अनर्घ्य रत्न । विक्रमासी देऊन । बोळवण केली कन्येची ॥ ३७७ ॥ असो सवें घेऊनि दळभार । उज्जयिनीसीं आला राजेश्वर । नगर शृंगारिलें सत्वर । अति आनंद होतसे ॥ ३७८ ॥ मग सुमुहूर्त पाहूनी । विक्रम बैसविला सिंहासनीं । याचक तृप्त केले दानीं । चिंता चित्तीं असेना ॥ ३७९ ॥ मग हें शनैश्चरव्रत । राजा विक्रम आचरित । पीडा गेली समस्त । शनिप्रसादेंकरोनी ॥ ३८० ॥ ही महाराष्ट्रभाषेची कथा । परी अर्थाविषयीं नाहीं न्यूनता । यथामति वर्णिली तत्त्वतां । श्रवण करा भाविक हो ॥ ३८१ ॥ हा ग्रंथ करितां श्रवण । सकळ विघ्ने जाती निरसून । ग्रहपीडा अति दारुण । न बाधे कदा कल्पांतीं ॥ ३८२ ॥ ऐकतां कथा नवग्रहांची । येणें पीडा निवारे क्लेशांची । वार्ताही नुरे दुःखाची । कृपा करिती ग्रह सर्व ॥ ३८३ ॥ श्रवणपठणीं निदिध्यास । लेखक पाठक सर्वांस । ग्रंथ संरक्षी तयास । क्लेश विघ्नें न बाधती कदा ॥ ३८४ ॥ ही शनैश्चराची ख्याती । केवळ शनैश्चराची मूर्ती । अहर्निशीं जे कां ध्याती । त्यांसी संरक्षी शनिदेव ॥ ३८५ ॥ सकळ दुःख दरिद्र । येणें निरसेल समग्र । भावें श्रवण करितां साचार । फळ प्राप्त तयासी ॥ ३८६ ॥ म्हणे तात्याजी महिपती । हे प्रीति पावो शनैश्चराप्रती । कृपाळू तो उग्रमूर्ती । निर्विघ्न करी सर्वांसी ॥ ३८७ ॥ इति श्रीशनैश्वराची कथा । करविता वदविता । आपुली तों मायिक वार्ता । श्रीपांडुरंग ॥ ३८८ ॥ ॥ इति श्रीशनैश्चरमाहात्म्यं संपूर्णम् । श्रीशनैश्चरार्पणमस्तु ॥
श्रीशनैश्चरमाहात्म्य
नवग्रह · प्रमुख स्तोत्रे व कवच
परिचय एवं महत्व
श्रीशनैश्चरमाहात्म्य (नवग्रह) सनातन परंपरा का एक अत्यंत श्रद्धापूर्ण पाठ है। प्रमुख स्तोत्रे व कवच के अंतर्गत नियमित रूप से इसका पाठ करने से मन को शांति और आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती है।
पाठ की विधि
प्रातः या सायंकाल स्नान के पश्चात स्वच्छ आसन पर बैठकर नवग्रह के समक्ष दीपक प्रज्वलित करें और शुद्ध उच्चारण के साथ श्रीशनैश्चरमाहात्म्य का पाठ करें।
पाठ के लाभ
भक्ति भाव से किया गया यह पाठ मानसिक एकाग्रता बढ़ाता है और घर-परिवार में सकारात्मक वातावरण का संचार करता है।